मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अव्वल स्थान असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या आढावा कार्यक्रमात ८ विभागांनी अव्वल कामगिरी केली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विभागाने बाजी मारली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शंभर दिवसांचा आढावा कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार केंद्र सरकारच्या क्वॉॅलिटी कौन्सिल ऑफ इंडिया या कंपनीच्या वतीने प्रत्येक विभागाचे लेखापरीक्षण करण्यात आले. या लेखा परीक्षणात ५९ विभागांपैकी सर्वात चांगली कामगिरी करणा-या आठ विभागांची निवड करण्यात आली आहे. या आठ विभागातून सर्वात चांगले पहिले तीन विभाग निवडले जाणार आहेत.
विशेष म्हणजे या आठ विभागांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्वाधिक विभागाचा समावेश आहे. क्वॉॅलिटी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या वतीने चांगली कामगिरी करणा-या आलेल्या विभागाची आकडेवारी पाहिली तर यामध्ये शिंदे यांच्या मंत्र्यांचा वरचष्मा असल्याचे दिसून येते. या आठ विभागांपैकी शिंदे यांच्या मंत्र्याकडे असलेल्या पाच विभागांचा समावेश आहे. तर दोन विभाग हे भाजपचे तर एक विभाग हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचा आहे. त्यामुळे आता यातील अव्वल तीन विभाग कोणते? हे पहावे लागणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचे ५ विभाग
या अव्वल ठरलेल्या ८ विभागांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग हा अव्वल क्रमांकावर आहे. त्यानंतर प्रताप सरनाईक यांचा परिवहन विभाग, प्रकाश आबिटकर यांचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि उदय सामंत यांचा उद्योग विभाग यासह एकनाथ शिंदे यांच्या गृहनिर्माण विभागाचा देखील समावेश आहे.
फडणवीसांसोबत गोरेंची कामगिरी अव्वल
भारतीय जनता पक्षाचा विचार करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेला ऊर्जा विभागाने यामध्ये स्थान मिळवले आहे. तर त्यांच्याच पक्षाचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या ग्रामविकास विभागाने देखील यामध्ये स्थान मिळवले आहे.
आदिती तटकरेंची कामगिरी
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्री आदिती तटकरे यांचा महिला व बालकल्याण विभागास या यादीमध्ये स्थान मिळाले आहे. महिला व बालकल्याण विभाग यादीमध्ये असून आता अंतिम ३ मध्ये कोणत्या विभागाचा क्रमांक लागतो, हे पाहावे लागेल.