23.8 C
Latur
Monday, August 11, 2025
Homeमहाराष्ट्रशिंदेसेना-भाजपात जुंपली

शिंदेसेना-भाजपात जुंपली

माझ्या नादी लागू नका : गोरंट्याल खोतकरांना इशारा

मुंबई : काँग्रेसचे माजी आमदार कैलास गौरंट्याल यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मंत्री रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मात्र या पक्षप्रवेशाने जालना जिल्ह्यात महायुतीत वादंग निर्माण झाला आहे. कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्यातच गोरंट्याल यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर खोतकरांना गर्भित इशारा दिला आहे. माझ्या नादी लागू नका, माझ्याकडे अनेक फाईल्स आहेत. मी पुराव्यासह बोलतो असे त्यांनी म्हटले आहे.

माजी आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की, माझ्याकडे त्यांच्या एवढ्या फाईल्स आहेत, मी जर तोंड उघडले तर फार पंचाईत होईल. मी पुराव्यासह बोलतो. त्याने सुरुवात केली की मी बोलणार, तो माझ्या नादी लागला तर मी सोडणार नाही. महायुती म्हणून मी काम करणार आहे. मात्र कुणीही मला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर मी तसेच प्रत्युत्तर देणार आहे. मी सुरुवात करणार नाही परंतु पुढून सुरू झाले तर मी संपवणार आहे. याआधी जे बोललो त्यावर पडदा टाका, आता त्या विषयावर बोलत नाही. तो विषय सोडून बोलतो असंही त्यांनी शिंदेसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचे नाव न घेता म्हटले आहे.

तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीत किती भ्रष्टाचार झाला सगळ्यांना माहिती आहे. या माणसाच्या मागे २ वेळा ईडी आली होती. मी १०० प्रकरणे काढून दाखवू. अर्जुन खोतकर काँग्रेसमध्ये होते, मग शिवसेनेत गेले. मग भुजबळ बाहेर पडले तेव्हा त्यांच्यासोबत गेला तिथूनही पळून गेला. नारायण राणेंमागेही पळणार होते. विलासराव देशमुखांशी जवळीक साधून काँग्रेसमध्ये येणार होते, त्यानंतर आता शिंदे गटात गेले. १०-१२ पक्ष बदलणारे हे लोक, मग खरा गद्दार कोण? आम्ही रडून गेलो नाही. ते रडत गेले. ईडीला घाबरून पक्षप्रवेश करत नाही असा टोलाही कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांना लगावला.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवावी अशी आमची मागणी आहे. ती मागणी शंभर टक्के पूर्ण होईल असे नाही. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून बोललो, आम्हाला फ्री हँड द्या, भारतीय जनता पार्टीचा महापौर जालना महापालिकेवर बसवू असं सांगितले आहे असेही माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR