मुंबई (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राज्यात आज, शुक्रवारपासून महाविजय संवाद अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार युवा सेना, महिला आघाडी आणि पक्षाचा सोशल मीडिया या ३ विभागांकडून महायुती सरकारच्या योजना, सरकारने गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामांची माहिती पोहोचवली जाणार आहे तसेच या अभियानाच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे.
शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरूवारी पक्ष कार्यालयात आयोजित या अभियानाची घोषणा केली. आपण स्वत: गेल्या काही दिवसांपासून जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतील ५० विधानसभा मतदारसंघात भेटी दिल्या आहेत. ही जनसंवाद यात्रा सुरू असतानाच आता महाविजय अभियान सुरू करण्यात येणार आहे. या अभियानाच्या अंतर्गत दररोज एका नेत्याने आणि उपनेत्याने एक विधानसभा मतदारसंघाला भेट द्यावी. त्यातील पाच ठिकाणी जाऊन गाठीभेटी घेणे, मेळावे घेतले पाहिजेत, असे या दौ-याचे स्वरुप आहे. २७ सप्टेंबरपासून सुरू होणा-या महाविजय संवाद अभियानाचा पहिला टप्पा ५ दिवसांचा असेल, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.
युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात युवा सेनेकडून भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून अभियानाची सुरुवात होईल. दररोज ६ विधानसभा मतदारसंघांना भेट देणार असून यात शाखा भेटी, मेळावे घेतले जातील. नवरात्रौत्सवात मुंबई आणि आसपासच्या विधानसभा मतदारसंघांना भेटी दिल्या जातील. १३ ऑक्टोबरपासून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि पुढे कोकण, असा युवा सेनेचा दौरा असेल, अशी माहिती सरनाईक यांनी या वेळी दिली तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, मुलींना मोफत शिक्षण या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या आहेत का? याचा आढावा महिला आघाडी घेईल, अशी माहिती शिवसेना नेत्या मीना कांबळी यांनी या वेळी दिली. शिवसेना युवा सेनेचे सरचिटणीस आणि शिवसेना सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुल कनाल यांच्या नेतृत्वात शिवसेना सोशल सैनिकांकडून नाशिक, नंदुरबार, धुळे, शिर्डी, नगर असा दौरा सुरू होणार आहे. या दौ-यात मी सोशल सैनिक, आवाज कुणाचा शिसवनेचा हे अभियान राबविण्यात येईल. सोशल मीडियाचा दौरा १० दिवसांचा असेल, असे कनाल यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गेल्या अडीच वर्षात मुंबईत काय काम केले? हे विरोधकांनी सांगायला हवे. स्वत: अडीच वर्ष घरात बसले आणि इतरांना पण घरी बसवले, अशी खरमरीत टीका डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या वेळी शिवसेना ठाकरे गटावर केली. कोविड काळात ज्यांनी बॉडीबॅग, कोविड सेंटर आणि खिचडीसारखे घोटाळे केले त्यांना सरकारवर आरोप करण्याचा अधिकार नाही, असे डॉ. शिंदे यांनी ठणकावले.