नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका-टिप्पणी केली जात आहे. त्यात अनेक पक्षबदलही होताना दिसत आहेत. असे असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांची दिल्ली भेट घेतली. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाला. त्यानंतर राज्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले असून, बुधवारी शिंदे गटाचे नेते उदय सामंत आणि नरेश म्हस्के यांनी पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. परंतु, ही एक औपचारिक भेट होती, याला राजकारणाशी जोडू नये, असे स्पष्टीकरण शिंदे गटाच्या नेत्यांनी दिले.
शरद पवार हे सध्या दिल्लीत आहेत. त्यांच्या दिल्लीतील निवासस्थान असलेल्या ६ जनपथ रोडवर सध्या महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यातच बुधवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शिंदे गटाचे नेते उदय सामंत आणि नरेश म्हस्के हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी शरद पवार आणि शिंदेंचा सत्कार कार्यक्रमावर जोरदार टीका केली आहे.