29.2 C
Latur
Monday, February 10, 2025
Homeमहाराष्ट्रशिरीष महाराजांचे ३२ लाखांचे कर्ज शिंदेंनी झटक्यात फेडले

शिरीष महाराजांचे ३२ लाखांचे कर्ज शिंदेंनी झटक्यात फेडले

पुणे : आर्थिक विवंचनेतून शिरीष महाराज मोरेंनी आत्महत्या केली अन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराजांच्या कुटुंबावरील कर्जाचे ओझे कमी केले आहे. संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी अर्पण करणा-या शिरीष महाराजांसाठी एकनाथ शिंदेंनी हे पाऊल उचलले आहे. आमदार विजय शिवतारेंनी शिरीष महाराजांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना शिंदेंनी पाठवलेली ३२ लाखांची रक्कम देऊ केली.

देहूतील राहत्या घरी ५ फेब्रुवारीला शिरीष महाराजांनी गळफास घेत आत्महत्या केली आणि वारकरी संप्रदयात शोककळा पसरली. ही बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समजली आणि त्यांनीही या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले. ज्या कारणाने महाराजांनी आत्महत्या केली, ते कर्जाचे ओझे आज स्वत: उपमुख्यमंत्री शिंदेंनी उतरवले.

कर्जामुळे उचलले टोकाचे पाऊल
संत तुकाराम महाराजांचे ११ वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची घटना घडली. डोक्यावर असलेल्या ३२ लाखांच्या कर्जामुळे हे पाऊल उचलल्याचे सुसाईड नोटमध्ये शिरीष महाराज मोरे यांनी नमूद केले होते. या घटनेच्या आधी, २० दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. मात्र त्यांच्या टोकाच्या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना मोठा धक्का बसला. दरम्यान, शिरीष महाराज मोरे यांनी कर्ज कशासाठी घेतले होते याची माहिती देखील समोर आली आहे.

शिरीष महाराज मोरेंनी कर्ज कशासाठी घेतलं?
कोरोनाच्या आधी शिरीष महाराज मोरे व्यवसाय क्षेत्रात उतरले होते. कागदी पिशवी बनवणे आणि त्यावर छपाई करुन देण्याचा व्यवसाय सुरु केला. यासाठी त्यांनी कर्ज उचलले होते. मात्र कोरोनाच्या काळात हा व्यवसाय बंद पडला आणि महाराजांना पहिले आर्थिक नुकसान झेलावं लागले.

अडीच वर्षांपूर्वी हॉटेल क्षेत्रात उतरण्याचे ठरवले. नादब्रह्म ईडलीची काही लाख रुपये मोजून फ्रेंचायजी घेतली. पिंपरी चिंचवड परिसरात हा नवा व्यवसाय सुरु केला, जो आज ही सुरु आहे. आधीचे कर्ज असताना पुन्हा या व्यवसायासाठी ही महाराजांनी कर्ज घेतले.

काही महिन्यांपूर्वी एक मजली घर बनवलं, त्यासाठीही लाखांमध्ये खर्च झाला.
अलीकडेच महाराजांनी चार चाकी गाडीही घेतली, त्यासाठीही त्यांनी कर्ज घेतलं होतं.

वारकरी संप्रदायावर दु:खाचा डोंगर
शिरीष महाराज मोरेंनी जगाचा निरोप घेताना, आपल्या मागे प्रत्येकाने दिलेलं कर्ज फेडावं असं म्हणत कोणावर अन्याय होणार नाही, याची दक्षताही घेतली. मात्र त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असं म्हणत चुकीची चर्चा घडवण्यात येत असल्याचं मोरे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अनेकजण किर्तनावर मोठे होत आहेत, मात्र शिरीष महाराजांनी आजवर मोफत किर्तनसेवा केली. त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायावर दु:खाचा डोंगर कोसळला. शिरीष महाराजांनी एकवेळ आवाज दिला असता तर अख्खा महाराष्ट्र मदतीला नक्कीच धावला असता अशी खंत देहूकर व्यक्त करत आहेत. शिरीष महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांचा आधार घेत, देहूरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR