22.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रशिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवले

शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवले

मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सामाजिक न्याय खात्याचे मंत्रिपद भूषवत असतानाही सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदावरून स्वत:हून पायउतार न झाल्याने राज्य सरकारने अखेर संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटविले आहे. नगरविकास विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

राज्य सरकारच्या नियम आणि संकेतानुसार मंत्रिपदी असलेल्या व्यक्तीने महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे अपेक्षित आहे. मात्र, मंत्रिमंडळात वर्णी लागून महिना उलटून गेला तरी शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नव्हता. सिडकोचे अध्यक्षपद हे लाभाचे पद असल्याने मंत्री बनल्यावर त्याचा राजीनामा देणे अपेक्षित होते. मात्र, सामाजिक न्याय खात्याची सूत्रे स्वीकारल्यानंतरही संजय शिरसाट यांनी राजीनामा दिला नव्हता. उलट सिडको संचालक मंडळाच्या बैठका घेऊन त्यांनी निर्णयाचा सपाटा लावला होता. ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शिरसाट यांना पदावरून बाजूला करण्याचे निर्देश नगरविकास विभागाला दिले होते.

या पार्श्वभूमीवर नगर विकास विभागाने आज संजय शिरसाट यांचा सिडको अध्यक्षपदाचा कार्यभार संपुष्टात आणणारा शासन निर्णय जारी केला. सिडकोच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनमधील २०२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारास अनुसरून शिरसाट यांची मंत्री म्हणून नियुक्ती झाली असल्याने त्यांच्याकडे सोपविण्यात आलेला सिडको अध्यक्षपदाचा कार्यभार संपुष्टात आणण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर म्हणजे सप्टेंबर महिन्यात संजय शिरसाट यांना सिडकोचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR