पुणे : सरकारने गरीब आणि गरजू लोकांसाठी सुरू केलेली ‘शिवभोजन’ योजना निधीच्या कमतरतेमुळे बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्य शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कृती समितीचे शिवभोजन चालक ओंकार भागवत, मयूर बोराटे, प्रसन्न भावे, सपना माळी आणि नितीन दलभंजन यांनी पत्रकार परिषदेत दिला.
शिवभोजन चालकांनी सांगितले, ही योजना दोन लाखांहून अधिक लोकांना फक्त १० रुपयांत जेवण पुरवते आणि राज्यभर २,००० केंद्रांवर चालू आहे. मात्र, निधी कमी असल्याचे कारण देत सरकार ती बंद करत आहे. या योजनेसाठी वर्षाला फक्त २६८ कोटी रुपये खर्च येतो, तर ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी वर्षाला ४८ हजार कोटी खर्च होतो.
म्हणजेच ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी एका महिन्यात लागणा-या पैशात ‘शिवभोजन’ योजना १० वर्षे चालू राहू शकते. ही योजना बंद झाली, तर अनेक महिलांचे रोजगार जातील आणि लाखो गरीब लोक अडचणीत येतील. त्यामुळे सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कृती समितीने दिला.