मुंबई : कुणाल कामरा याने कॉमेडी शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक नवीन गाणं म्हटले आहे. हे गाणं सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. कुणाल कामरा याने या गाण्यातून एकनाथ शिंदे यांना राजकीय टोले लगावले आहेत. शिवसेनेतून बाहेर पडून भाजपाला दिलेल्या पाठिंब्याचा यात उच्चार आहे. तसेच गद्दारीचाही उल्लेख आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. तर दुसरीकडे शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. खार येथील कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केल्याची मोठी अपडेट समोर आली आहे.
कुणाल कामरा याच्या गाण्याविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. कुणाल कामराच्या खार येथील शोच्या सेटची ६० ते ७० शिवसैनिकांनी तोडफोड केली. राहुल कनाल यांनी कुणाल कामराच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी सावंत म्हणाले, कुणाल कामराच्या गाण्यावर आताच आम्ही चर्चा केली. ते पूर्ण गाण ऐकून आम्ही त्यावर एफआयआर दाखल करणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर जर कोणी बदनामीकारक गाणं तयार करायला लागलं तर आम्ही काही शांत बसणार नाही, त्यावरती आम्ही कारवाई करणार, असंही उदय सामंत म्हणाले.
संजय राऊतांनी केलेल्या ट्विटवर बोलताना सामंत म्हणाले, त्यांनी काय ट्विट केले . हे पाहण्यापेक्षा आमची भूमिका काय हे पाहणे महत्वाचे आहे. एखाद्याची बदनामी करायला एखाद्याला आनंद वाटतो, पण आम्ही ती भावना नाही, ते संस्कार आमचे नाहीत, असंही सामंत म्हणाले.