छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. तिकिट न मिळाल्यामुळे राज्यातील अनेक नेते नाराज आहेत. याच नाराजीमुळे अनेक नेत्यांनी पक्षबदल केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे हेदेखील लवकरच भाजपात जाणार असल्याचे म्हटले जात आहे. संभाजीनगरची उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. यावर भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी सूचक वक्तव्य केले आहे. अंबादास दानवे यांचे विचार आमच्यापेक्षा काही वेगळे नाहीत. ते पूर्वाश्रमीचे भाजपचेच आहेत, असे दानवे म्हणालेत.
आमच्या विचारांशी सहमत असणा-या लोकांना पक्षात आणण्याचे काम आम्ही पहिल्यापासून करत आलो आहोत. ज्या घटना घडतील त्याची माहिती आम्ही तुम्हाला देत राहू, असे रावसाहेब दानवे म्हणाले. अंबादास दानवे यांच्याशी संपर्क झाला आहे का, असा प्रश्न रावसाहेब दानवे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना अंबादास दानवे हे पूर्वाश्रमीचे भाजपचेच आहेत. भाजप आणि अंबादास दानवे यांचे विचार काही वेगळे नाहीत. पण ते त्यांच्या पक्षाचं काम करतात आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो. त्यांच्याशी आमचा थेट संपर्क झाला नाही, असे दानवे यांनी सांगितले.
त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीवरही भाष्य केले. संभाजीनगरची जागा निवडून यावी यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत. ठाकरे गटाला शेवटचा धक्का हा ४ जून रोजी बसणार आहे. ही निवडणूक आहे. आम्हाला आत्मविश्वास नडणार नाही याची आम्ही काळजी घेतो. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमचे महाराष्ट्रातून ४५ खासदार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.