ठाणे : प्रतिनिधी
विरारमधील नवापूर येथील एका रिसॉर्टमध्ये ठाणे जिल्ह्याचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. रविवार असल्याने कुटुंबाबरोबर रिसॉर्टला गेलेले शिवसेनेचे ठाणे उपजिल्हाप्रमुख ४५ वर्षीय मिलिंद मोरेंचा मृत्यू होण्याच्या काही वेळाआधी त्यांचा स्थानिकांबरोबर किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. मात्र याच वादातून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांना मारहाण झाल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
दरम्यान, विरारमधील नवापूर येथील रिसॉर्टमध्ये मिलिंद मोरे यांचा अचानक मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण सुरुवातीला स्पष्ट झाले नव्हते. विरारच्या ‘सेवेन सी रिसॉट’मधील सीसीटीव्हीमध्ये मिलिंद मोरेंच्या मृत्यूचा घटनाक्रम कैद झाला आहे. स्थानिकांबरोबर पार्किंगमध्ये उभे राहून बोलत असताना मिलिंद अचानक चक्कर आल्याने कोसळले. कारच्या बोनेटला टेकून उभे असताना अचानक मिलिंद मोरेंनी मान टाकली आणि ते खाली कोसळले. मिलिंद मोरेंना तात्काळ नजीकच्या पकृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांना मयत घोषित करण्यात आले.
मिलिंद मोरे आपल्या कुटुंबासह सह ८ ते १० जणांसोबत ‘सेवेन सी रिसॉट’मध्ये आले होते. गाडी गेटमधून मागे पुढे करताना एक रिक्षाचा धक्का लागल्याने मोरे आणि या रिक्षावाल्यामध्ये भांडणे झाले. यावेळी रिक्षाचालकाने स्थानिकांच्या मदतीने मिलिंद आणि इतर दोघांना मारहाण केली. याच मारहाणीमुळे मिलिंद मोरेंचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मिलिंद मोरे यांना मारहाण झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.