28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रशिवसेना आमदार अपात्रता सुनावणी

शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी

मुंबई (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाने ३१ डिसेंबरची मुदत दिल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुरू असलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला वेग आला असून आज शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्यात आली. या वेळी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करताना एकनाथ शिंदे संपर्कात नव्हते तर मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक सुरतला जाऊन त्यांना कसे भेटले? असा सवाल केला. तेव्हा त्यांनी कशासाठी भेट घेतली हे मला माहिती नाही, असे उत्तर प्रभू यांनी दिले. या वेळी जेठमलानी व प्रभू यांच्यात खडाजंगीही झाली. या प्रकरणाची आता दैनंदिन सुनावणी होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आज पार पडली. दोन सत्रांत चाललेल्या या सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदविण्यात आली. पक्षात फूट पडली तेव्हा सुनील प्रभू हे प्रतोद होते व त्यांनी जारी केलेला व्हीप हा प्रकरणातील निर्णायक मुद्दा ठरणार असल्याने प्रभू यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची आहे. प्रभू यांच्या बरोबरच व्हीप बजावणा-या कार्यालयीन कर्मचा-यांचीदेखील साक्ष नोंदविण्यात येणार आहे. यावर पुढचे ३ दिवस सलग सुनावणी होणार आहे.

शिवसेनेतील फुटीमागे भाजपाचा हात होता, असा उल्लेख याचिकेत कशाच्या आधारावर केला आहे? त्या बाबतचे कोणते पुरावे तुमच्याकडे आहेत? असा सवाल शिंदे गटाच्या वकिलांनी प्रभूंना केला. त्यावर आम्ही २०१९ साली काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार बनविले तेव्हा एकनाथ शिंदे हेदेखील मंत्री बनले मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिंदे हे दबावतंत्रात येऊन नियमबा पदधतीने वागले. भाजपा भ्रष्ट पद्धतीने वागली, त्या संदर्भानेच हे नमूद केल्याचे प्रभू म्हणाले. हे तुमचे मत आहे की, तुमच्याकडे पुरावा आहे? असा प्रश्न शिंदे गटाने केला त्यावर प्रभू म्हणाले, आमच्या पक्षाचे अनेक आमदार पळून जात होते त्यामुळे त्यांना पळवून नेण्यामागे कोणीतरी असावे, अशी माध्यमांत चर्चा होती म्हणून मला जे वाटले ते त्यात नमूद केल्याचे प्रभू म्हणाले.

२१ जून २०२२ पासून एकनाथ शिंदे हे शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या संपर्कात नव्हते. मग २३ जून २०२२ रोजी उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून त्यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांनी सुरतला जाऊन शिंदेंची भेट घेतली. शिवसेनेतील अंतर्गत वाद सोडविण्यासाठी ही भेट होती का? असा प्रश्न प्रभू यांना विचारण्यात आला. त्यावर प्रभू यांनी एकनाथ शिंदे हे संपर्कात नव्हते हे खरे आहे; पण नार्वेकर आणि फाटक यांनी कोणत्या कारणासाठी भेट घेतली हे मला माहिती नाही, असे प्रभू यांनी सांगितले. निवडणुकीत आपण काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका केली होती का? प्रचारात आपण मोदी, शहा, फडणवीस यांचा फोटो वापरला का? या प्रश्नांवरून शिंदेंचे वकील व प्रभू यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. निवडणुकीत आपण विकासाच्या मुद्यावर प्रचार केला होता. पोस्टरवर काय छापले मला आठवत नाही. युती होती. माझ्या पोस्टरवर सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे पोस्टर मात्र नक्की होते, असे प्रभू सांगितले.

साक्षीचे व्हीडीओ रेकॉर्डिंग करा – ठाकरे गटाची मागणी
शिवसेनेत पडलेल्या फुटीच्या वेळी पक्षाने पाठवलेल्या नोटीस, तत्कालीन वृत्तपत्रांची कात्रणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी केलेल्या पोस्ट हे सर्व पुरावे म्हणून सादर केले आहेत. या सर्व युक्तिवाद व आक्षेपांचे व्हीडीओ रेकॉर्डिंग करावे, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी या वेळी केली आहे मात्र विधानसभा अध्यक्षांनी त्यांची ही मागणी मान्य करताना सर्व युक्तिवाद व आक्षेप रेकॉर्डवर घेतले जात असल्याचे सांगितले. उद्या सकाळी ११ वाजता पुन्हा सुनावणी सुरू होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR