नाशिक : प्रतिनिधी
नाशिकचा देवळाली मतदारसंघ सध्या राज्यभर चर्चेत आहे. महायुतीकडून अजित पवार गटाच्या सरोज आहिरे आणि शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव आमने-सामने आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजश्री अहिरराव अचानक नॉट रिचेबल झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.
दरम्यान, नाशिकच्या देवळाली मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. देवळालीच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरोज आहिरे याच आहेत, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. महायुतीच्या नेत्यांसोबत वरिष्ठ पातळीवर चर्चा केली जाईल आणि यावर तोडगा काढला जाईल, असे छगन भुजबळांनी म्हटले. आता शिवसेना शिंदे गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना शिंदे गटाची अजित पवार गटाविरोधाची ही खेळी आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान राजश्री अहिरराव माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, नाशिकमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काय झाले याची मला कुठलीही कल्पना नाही. माघारीबाबत माहिती नाही. मी देवदर्शन करत होते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. माझ्यासमोर कोणाचेही आव्हान नसून माझा विजय निश्चित असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.