नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती. मात्र आधीचा खटला लांबल्याने सुनावणी होऊ शकली नाही. परंतु सरन्यायाधीशांनी अजित पवारांसह त्यांच्या ४१ आमदारांना पुढील ३ आठवड्यांत जयंत पाटील यांच्या याचिकेवर उत्तर देण्याची मुदत दिली आहे. तर शिवसेनेबाबत हे जुनं प्रकरण असून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी कोर्टात उत्तरही सादर केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही बाजूच्या वकिलांना संकलन तयार करून सादर करण्यास सांगितले आहे.
आज कोर्टात जे घडले त्याबाबत वकील सिद्धार्थ शिंदे यांनी माहिती दिली की, शिवसेना आणि राष्ट्रवादीबाबत पुढच्या सुनावणीची तारीख दिली नाही. पण साधारत: सप्टेंबर महिन्यात हे प्रकरण सुनावणीस येईल. शिवसेनेचे प्रकरण हायकोर्टात न होता सुप्रीम कोर्टातच सुनावणी होईल. त्याचा निकाल सप्टेंबर किंवा ऑक्टोबर येणे अपेक्षित आहे. राष्ट्रवादीच्या प्रकरणात ३ आठवड्यात अजित पवार आणि त्यांच्या आमदारांनी उत्तर द्यावें असे कोर्टाने सांगितले आहे. दोन्ही प्रकरणाची पुढील तारीख एक दिवसांत कळेल असे त्यांनी सांगितले.
तर आज शिवसेनेच्या वकिलांनी हे प्रकरण लवकरात लवकर सुनावणी घेऊन निकाल द्यावा अशी इच्छा प्रकट केली. त्यावर सरन्यायाधीश संतापून मग तुम्हीच येऊन इथे बसा असे सुनावले. शिवसेनेच्या दोन्ही बाजूने संकलन दिल्यानंतर ही सुनावणी सुप्रीम कोर्टातच चालेल. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. आज दोन्ही प्रकरणासाठी मुहूर्त लाभला नसला तरी सप्टेंबरमध्ये तारीख येईल तेव्हा दोन्ही प्रकरणे ऐकले जातील आणि त्यावर निकाल येईल असे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटले.
सरन्यायाधीश का संतापले?
शिवसेनेच्या प्रकरणात विलंब होत असल्याने आज ठाकरे गटाच्या वकिलांकडून खटल्यास विलंब होत आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तारीख द्यावी अशी आग्रही मागणी केली. त्यावर तुम्ही आमच्या इथे येऊन बसा आणि तुम्हीच ठरवा. आमच्यावर खूप ताण असतो, तुम्हाला १-२ दिवसात तारीख दिली जाईल असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संतापून उत्तर दिले.