24.1 C
Latur
Tuesday, July 15, 2025
Homeमहाराष्ट्रशिवाजी महाराजांची दुर्गसंपदा म्हणजे महाराष्ट्राच्या शौर्याचा वारसा

शिवाजी महाराजांची दुर्गसंपदा म्हणजे महाराष्ट्राच्या शौर्याचा वारसा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, स्वर्णदुर्ग, विजयदुर्र्ग, खान्देरी हे ११ किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजी असे एकूण १२ किल्ले जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेली दुर्गसंपदा ही महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि सांस्कृतिक वारसा आहे. या ऐतिहासिक किल्ल्यांचा युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश होणे ही संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत काढले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्याना युनोस्कोचे मानांकन मिळाले आहे. या प्रकरणी फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदन केले. फडणवीस म्हणाले, भौगोलिक परिस्थ­तिीचा उत्तम वापर करून किल्ले बांधणी, गनिमी काव्याला अनुकूल भूरचनेचा उत्तम वापर, वैशिष्टयपूर्ण दरवाजे, लष्करी रणनिती, गनिमी कावा याला पूरक ठरणारी डोंगरी किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली. पूर्वीच्या राजांनी किल्ले महसूल विषयक नियंत्रणासाठी बांधले. मात्र शिवाजी महाराजांनी याचा वापर लोक कल्याणार्थ निर्माण झालेल्या स्वराज्य बांधणीसाठी केला. हा विचार युनेस्कोने अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून मान्य केला आहे.

यावेळी फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले. पंतप्रधानांकडे देशातील वेगवेगळ्या भागातून ७ प्रस्ताव युनोस्कोमध्ये नामांकन होण्यासाठी गेले होते. त्यापैकी पंतप्रधानांनी निर्णय घेऊन छत्रपती शिवरायांचे किल्ले हेच जागतिक वारसा म्हणून नामांकन करायचे ठरविले. या संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य करणा-या सर्वांचे फडणवीस यांनी आभार व्यक्त केले. सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत असणा-या पुरातत्त्व वास्तूसंग्रालयाचे, संचालनालयाचे संचालक यांनी हा प्रस्ताव तयार केला.

संपूर्ण भारतातून भारतीय पुरातत्व सर्वेक्षणास आठ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यामध्ये महाराष्ट्राच्या दोन प्रस्तावांचा समावेश होता. त्यातील भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश या प्रस्तावाची पंतप्रधान मोदी यांच्यावतीने निवड करण्यात आली. या नामांकनाच्या कार्यवाहीचा भाग म्हणून प्रस्तावाची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी द. कोरिया येथील श्री. कोगली यांनी महाराष्ट्र, तमिळनाडू राज्यातील किल्ल्यांना भेट दिली. यासंबंधी नवी दिल्ली येथे जुलै २०२४ मध्ये झालेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे ४६ व्या अधिवेशनातील चर्चासत्रात महाराष्ट्रातील तज्ञांनी भाग घेतला. युनेस्को मुख्यालय, पॅरिस येथे या प्रस्तावाचे तांत्रिक सादरीकरण करण्यात आले.

सर्व सदस्य देशांमध्ये मतदानाद्वारे यावर सदस्य देशांची मते आजमावण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर बैठका घेण्यात आल्या. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, युनेस्को, भारताचे राजदूत आणि अनेक देशांच्या राजदूतांशी थेट संपर्क साधून नामांकन झालेल्या किल्ल्याचे महत्त्वही फडणवीस यांनी विशद केले. ११ जुलै २०२५ रोजी युनेस्कोच्या सांस्कृतिक समितीच्या आंतराराष्ट्रीय बैठकीत एकमताने भारताने ही विजयश्री खेचून आणली आहे. जवळपास सगळ्या समितींपैकी मतदानाचा अधिकार २० देशांना होता. या २० ही देशांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे हे किल्ले जागतिक वारसा स्थळ आहे असे मतदान केले. त्यामुळे एकमताने हा प्रस्ताव मंजूर झाला, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या अद्वितीय किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी हातभार लावावा असे आवाहनही त्यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR