सिंधुदुर्ग : मालवणच्या ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण रविवार दि. ११ मे रोजी करण्यात आले आहे. या भव्य सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच स्वाभिमानाने आणि अधिक भव्यतेने उभारला आहे. मागच्या काळात ज्यावेळी दुर्दैवी घटना झाली होती, त्यावेळी आमच्या सरकारने निर्धार केला होता की विक्रमी वेळेत हा पुतळा या ठिकाणी आम्ही पुन्हा प्रस्थापित करू. आज त्याचे पूजन आम्ही केले आहे. मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन करतो.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण असतील किंवा आताचे मंत्री शिवेंद्र भोसले असतील यांनी अतिशय वेगाने हे काम केले आहे. त्यासोबत सुतार साहेब यांनी अतिशय उत्तम पुतळा तयार केला आहे. त्याच्यासोबत आयआयटीचे विद्यार्थी होते, जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी होते. इथे कोकणात वेगवेगळे वादळ येतात, त्या सगळ्या वादळांचा अभ्यास करून हा पुतळा राहू शकेल अशी रचना करण्यात आली आहे.
जवळपास ९१ फूटांचा हा पुतळा आहे. ज्यात १० फूट पेडेस्ट्रॉल आहे. देशातील महाराजांचा हा सर्वात उंच पुतळा म्हणून याकडे पाहता येईल. किमान शंभर वर्ष कुठल्याही प्रकारच्या वातावरणात हा पुतळा टिकेल. तसेच १० वर्ष देखभालीची जबाबदारी ज्यांनी पुतळा तयार केलेला आहे, त्यांच्याकडे देण्यात आली आहे. जी काही दुर्दैवी घटना मागे घडली होती, तेव्हा आम्ही निर्धार केला होता की कुठल्याही परिस्थितीत महाराजांना साजेसे स्मारक तयार करण्यात येईल.