21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeक्रीडाशिवम दुबे घेणार हार्दिक पांड्याची जागा!

शिवम दुबे घेणार हार्दिक पांड्याची जागा!

मुंबई : अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. अफगाणिस्तानविरुद्ध नुकत्याच जाहीर झालेल्या संघातही तो नाही. पण धोनीचा पठ्ठ्या अष्टपैलू शिवम दुबे पांड्याची पोकळी भरून काढू शकतो. रणजी ट्रॉफीमधील कामगिरीनंतर याचा अंदाज लावल्या जात आहे.

मुंबईचा अष्टपैलू शिवम दुबेने रणजी ट्रॉफीमध्ये कहर केला आहे. बिहारविरुद्धच्या सामन्यात त्याने प्रथम ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४१ धावांची शानदार खेळी केली आणि नंतर गोलंदाजी करताना ६ विकेट घेतल्या.

बिहारविरुद्धच्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत २५१ धावा फलकावर लावल्या, या धावसंख्येसमोर बिहारचा संपूर्ण संघ पहिल्या डावात १०० धावांवरच मर्यादित राहिला. यादरम्यान दुबेने दोन गडी बाद केले. मुंबईने बिहारला फॉलोऑन देत पुन्हा फलंदाजी करण्यास सांगितले. दुस-या डावात मुंबईने पुन्हा बिहारला १०० धावांत गुंडाळले आणि सामना एक डाव आणि ५१ धावांनी जिंकला. दुबेने दुस-या डावात ११ पैकी ७ षटके टाकली आणि ४ बळी घेतले.

हार्दिक पांड्या उत्कृष्ट फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही योगदान देतो. पण तो नसताना कर्णधाराला त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये २-२ बदल करावे लागतात.

आयपीएल २०२३ मध्ये शिवम दुबेला अनेक शानदार खेळी खेळताना आपण पाहिले आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना त्याने बरेच लांब षटकार मारले आहेत. पण गोलंदाजीत तो थोडा कमजोर होता. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याने रणजी ट्रॉफीमध्ये केली तशी कामगिरी केल्यास तो हार्दिक पांड्याला नक्कीच टक्कर देऊ शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR