नवी दिल्ली : मराठीमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या, तसेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिल्याने ते राज्यात विधानसभा निवडणूक लढवणार का, अशीही चर्चा रंगली होती. शिवदीप लांडे यांचे सासरे माजी मंत्री असून ते सध्या विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारही आहेत. त्यामुळे, शिवदीप लांडेंचा राजीनामा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांशी जोडला जात होता. मात्र, अखेर आयपीएस लांडेंचा राजीनामा स्वीकारण्यात न आल्याने त्यांना बिहार राज्यातच मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
आता, त्यांची बदली करण्यात आली असून त्यांना पोलिस महानिरीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे. बिहार राज्यातील पाटणा पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवदीप लांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार हेच माझे कार्यस्थान राहील असे म्हटले होते. त्यांच्या एका वक्तव्याने राजकीय भुवया मात्र उंचावल्या गेल्या होत्या. शिवदीप लांडे यांनी सांगितले होते की, मी सेवेतून राजीनामा दिला आहे, पण पुढे काय करायचे ते ठरवले नाही. शिवदीप लांडे हे शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय श्रीगणेशाची सुद्धा चर्चा रंगली होती. मात्र, आता त्यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.