24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील २४ जिल्ह्यांतील शिवार होणार जलयुक्त

राज्यातील २४ जिल्ह्यांतील शिवार होणार जलयुक्त

मुंबई : जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार असा विश्­वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्यात जलयुक्त शिवारच्या दुस-या टप्प्यास गती देण्याकरिता राज्य शासनातर्फे व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसमवेत सामंजस्य करार करण्यात आला.

त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. हॉटेल ताज येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्री श्री रवीशंकर उपस्थित होते. याप्रसंगी राज्यात नैसर्गिक शेती करण्यासंदर्भात व्यक्ती विकास केंद्रासमवेत कृषी विभागाने देखील सामंजस्य करार केला.

जलयुक्त शिवार २ मध्ये गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार च्या कामासाठी मृदा व जलसंधारण विभागाच्या वतीने सामंजस्य करारावर सचिव सुनील चव्हाण आणि व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था केंद्राचे अध्यक्ष प्रसन्न प्रभू यांनी स्वाक्षरी केली.

या कराराद्वारे राज्यातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, ठाणे, पालघर अशा २४ जिल्ह्यांतील ८६ तालुक्यात जलयुक्त शिवारची गाळ काढण्याची तसेच जल स्त्रोतांचे खोलीकरण, नद्यांचे रुंदीकरण, सिमेंट बंधारे बांधणे, शेत तळ्यांची कामे होणार आहेत. हा कार्यक्रम तीन वर्षांच्या कालावधीचा असेल.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ग्लोबल वॉर्मिंगमुळे आज अनेक पर्यावरणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यात चांगले यश मिळाले.

सामंजस्य करून जलयुक्त शिवराच्या कामाला नैसर्गिक व सेंद्रिय शेतीची जोड देऊ शकलो ही मोठी गोष्ट आहे. मिशन मोडवर आम्ही जलयुक्त शिवार २ टप्पा राबविणार आहोत. जालना जिल्ह्यात वाटुरमध्ये मी गेलो असताना जलयुक्त शिवारमुळे झालेली किमया पाहिली असेही ते म्हणाले.

धरणांमधला गाळ काढणार
यावर्षी पाऊस ही कमी झाला आहे त्यामुळे अगदी योग्य वेळी हा जलयुक्त शिवारचा करार होतोय असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ जमा झालेला आहे. तेथील साठवणूक क्षमता वाढविण्यावर शासन काम करीत आहे. कॅन्सर सारखे रोग वाढत चालले आहे, त्यासाठी आपण सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे वळणे गरजेचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR