पुणे : पुण्यातील महापालिका मेट्रो स्थानकावर राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत मेट्रो सेवा ठप्प केली. मात्र आंदोलनाचा तणाव इतका वाढला की आंदोलकांनी थेट पोलिस अधिका-यांवर पेट्रोल टाकण्याचा धक्कादायक प्रकार केला.
या हिंसक आंदोलनात पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या अंगावर आंदोलनकर्ते नरेंद्र पावटेकर आणि त्यांच्या सहका-यांनी पेट्रोल फेकले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला, मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांनी आंदोलकांना चांगलाच चोप देत ताब्यात घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कसबा मतदारसंघातील कार्यकर्ते नरेंद्र पावटेकर दुपारी दोनच्या सुमारास कार्यकर्त्यांसह महापालिका मेट्रो स्थानकावर आले. त्यांच्या हातात पेट्रोलच्या बाटल्या होत्या आणि काही महिला कार्यकर्त्याही त्यांच्यासोबत होत्या. आंदोलनकर्त्यांनी थेट मेट्रोच्या मार्गिकेवर धाव घेत मेट्रो सेवा ठप्प केली. मेट्रोच्या अधिका-यांनी तातडीने पोलिसांना बोलावले.
पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. तब्बल तासभर आंदोलकांची समजूत काढण्यासाठी पोलिसांनी हात जोडून विनंती केली, मात्र आंदोलक मागे हटण्यास तयार नव्हते.
पावटेकरांची पक्षाच्या नेत्यांनाही शिवीगाळ
संवादादरम्यान पावटेकर आणि त्यांचे एक साथीदार रेल्वे मार्गिकेवरील कठड्यावर चढले. त्यांची कुठल्याही क्षणी तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता होती. उपायुक्त गिल्ल यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता आंदोलकांनी त्यांना थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याने गिल्ल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना फोन करून परिस्थिती समजावून सांगितली. मात्र पावटेकर यांनी पक्षनेत्यांनाही शिवीगाळ करत ते आम्हाला पुढे येऊ देत नाहीत असा आरोप केला आणि बोलण्यास नकार दिला.
पोलिसांनी घेतला आक्रमक पवित्रा
आंदोलकांशी चर्चा अयशस्वी झाल्याने पोलिसांनी त्यांना हटवण्यासाठी पुढे पाऊल टाकले. त्याच वेळी नरेंद्र पावटेकरने पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या अंगावर पेट्रोल फेकले. या घटनेमुळे पोलिस पथकात गोंधळ उडाला. सुदैवाने उन्हाच्या तीव्रतेमुळे किंवा मेट्रोच्या ओव्हरहेड वायरमुळे पेट्रोल पेट घेतले नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. गिल्ल यांनी स्वत: पावटेकरला पकडून खाली खेचले आणि पोलिसांच्या ताफ्यात ओढत नेले.
आंदोलकांना पोलिसांचा चोप
या घटनेनंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी कठोर पावले उचलली. १५ ते २० आंदोलकांना अटक करून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या झटापटीत काही पोलिस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले.
पावटेकर यांची पक्षातून हकालपट्टी
या हिंसक आंदोलनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने आंदोलनकर्त्यांपासून स्वत:ला वेगळे केले आहे. पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अधिकृत निवेदन जारी करून नरेंद्र पावटेकर यांची पक्षातून हकालपट्टी जाहीर केली. नरेंद्र पावटेकर हे तीन महिन्यांपूर्वी पक्षात प्रवेश केले होते. मात्र त्यांनी कोणत्याही पक्षीय कार्यक्रमात सहभाग घेतलेला नाही. आजचे आंदोलन पूर्णत: वैयक्तिक असून पक्षाचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. त्यांनी पुणेकरांची अडवणूक केली आणि पोलिसांवर हल्ला केला, त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. झ्र प्रशांत जगताप, अध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट).
गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पावटेकर आणि त्यांच्या साथीदारांवर सरकारी कामात अडथळा, शासकीय अधिका-यावर हल्ला, जीवितास धोका निर्माण करणे यांसारख्या गुन्ह्यांसाठी भारतीय दंड संहितेतील कठोर कलमांखाली गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे.