मुंबई : मुंबईतील जुहू परिसरातील पुष्पा पार्कजवळ अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी हा गोळीबार केला. या घटनेत टायगर श्रॉफ, त्याचा चालक आणि एका रिक्षाचालकासह एकूण तीन जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसेच, गुन्हे शाखेची पथकेही तपास करत आहेत. या गोळीबारामागे नेमका कोणाचा हात आहे आणि हल्ल्याचा उद्देश काय होता, याचा शोध पोलिस घेत आहेत. सध्या तरी ही प्राथमिक स्वरूपाची माहिती असून पोलिस लवकरच अधिकृत तपशील देतील अशी अपेक्षा आहे. बॉलिवूडमधील एका नामांकित अभिनेत्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
















