जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर ऑनर किलिंगच्या घटनेने हादरले आहे. प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका निवृत्त सीआरपीएफ अधिका-याने लग्नसोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमात घुसून आपल्या मुलीवर गोळीबार केला आहे. यात मुलीचा मृत्यू झाला तर जावई गंभीर जखमी झाला.
या घटनेत तृप्ती वाघ(२४) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिचा पती अविनाश वाघ यांच्या पाठीत गोळी घुसली आहे. ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण वर्षभरापूर्वी तृप्ती हिने अविनाश वाघ याच्याशी प्रेमविवाह केला होता.
हा विवाह तृप्तीचे वडिल किरण मांगले यांना मान्य नव्हता. विवाहानंतर हे दाम्पत्य पुण्यात राहत होते. अविनाशच्या बहिणीच्या लग्नासाठी दोघेही शनिवारी जळगावच्या चोपडा शहरात आले होते. याची माहिती मिळताच किरण मांगले चोपड्यात आले आणि थेट लग्नस्थळी पोहोचत तृप्ती आणि अविनाशवर गोळ्या झाडल्या. गोळीबारात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश गंभीर जखमी झाला आहे.
तृप्तीचे वडील किरण अर्जुन मांगले हे सीआरपीएफचे निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी त्यांच्या परवाना असलेल्या बंदुकीचा वापर करून हा गोळीबार केल्याची माहिती आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर लग्नात आलेल्या व-हाडींनी गोळीबार करणा-या मांगले यांना चोप दिला. त्यात तेही गंभीर जखमी झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर पोलिसांनी त्याठिकाणी तत्काळ धाव घेतली. पोलिसांनी किरण यांनी या गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल जप्त केली आहे. जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या घटनेची माहिती दिली. तृप्तीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रात्री उशिरा उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला. तसेच गंभीर जखमी असलेल्या अविनाश आणि किरण या दोघांनाही जळगाव येथे हलविण्यात आले.
या घटनेमुळे चोपडा शहरात खळबळ उडाली आहे. तसेच वाघ यांच्या घरावर शोककळा पसरली आहे. सध्या पोलिस या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान जळगाव जिल्ह्यात आठवडाभरात गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत. त्यात धरणगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पोलिसांचा धाक उरला नसल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामन्य नागरिक व्यक्त करत आहेत.