नवी दिल्ली : कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या निर्णयामुळे भाजप आक्रमक झाली आहे. कर्नाटक राज्य सरकारने विधानसभेत हिंदू मंदिराच्या संबंधात एक विधेयक मांडले होते. त्याला मंजुरी मिळाली आहे. यावरुन भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला हिंदू विरोधी ठरवले आहे.
भाजपने दावा केला की, काँग्रेस हिंदू मंदिरांकडून टॅक्स वसूल करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस हिंदू विरोधी निती वापरत आहे. बुधवारी कर्नाटक सरकारने विधानसभेत विधेयक सादर केले. या विधेयकामुळे १ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या मंदिरांकडून १० टक्के टॅक्स वसूल केला जाणार आहे. शिवाय १० लाख ते १ कोटी रुपये उत्पन्न असलेल्या मंदिरांना ५ टक्के टॅक्स द्यावा लागणार आहे.
विधेयक मंजूर झाल्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचे पुत्र आणि भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येदियुरुप्पा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस सरकार राज्यामध्ये हिंदू विरोधी अजेंडा राबवत आहे. आता त्यांचा हिंदू मंदिरांवर डोळा आहे. मंदिराकडून पैसे घेऊन आपली तिजोरी भरण्यासाठी नवा कायदा मंजूर करण्यात आलाय, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
सरकारकडून १ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या मंदिरांना १० टक्के टॅक्स लावण्यात आला आहे. भाविकांनी दिलेले दान हे मंदिराचे नुतनीकरण आणि भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वापरले पाहिजे, असे विजयेंद्र म्हणाले आहेत. हिंदू मंदिरांनाच लक्ष्य का केले जात आहे, असा सवाल त्यांनी काँग्रेस सरकारला विचारला आहे.
दुसरीकडे, काँग्रेसकडून भाजपला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजप राजकारणामध्ये धर्म आणण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसच खरी हिंदू समर्थक आहे, असे म्हणत राज्य सरकारमधील मत्री रामल्ािंगा रेड्डी यांनी पलटवार केला आहे. दरम्यान, या मुद्द्यावरुन दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. येत्या काळात याची धार वाढण्याची शक्यता आहे.