29.4 C
Latur
Saturday, April 13, 2024
Homeराष्ट्रीय२०० जागा तर जिंकून दाखवा

२०० जागा तर जिंकून दाखवा

ममतांचे भाजपला आव्हान

कोलकाता : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. अशा स्थितीत सर्वच पक्ष आपला विजय निश्चित करण्यात व्यस्त आहेत. तर भाजप ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा दावा करत आहे. यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी भाजपवर चांगलाच निशाणा साधला. ४०० जागा जिंकण्याचा दावा सोडा फक्त २०० जागा तरी जिंकून दाखवा असा स्पष्ट इशारा ममतांनी भाजपला दिला आहे. यासोबतच पश्चिम बंगालमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू होऊ देणार नाही, असेही ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला उद्देशून म्हटले. ममता लोकसभा उमेदवार महुआ मोईत्रा यांच्या प्रचारासाठी कृष्णानगरमध्ये एका रॅलीत बोलत होत्या.

एका प्रचार रॅलीला संबोधित करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील लोकांना चेतावणी दिली की, सीएएसाठी अर्ज करणारे लोक परदेशी होतील. त्यामुळे लोकांनी सीएएसाठी अर्ज करू नये. देशात बेरोजगारी आणि जातीय तेढ निर्माण करून भाजप यावेळी ४०० पार करण्याचा नारा देत आहे. मी त्यांना आव्हान देतो की, त्यांनी आधी २०० जागांचा आकडा पार करून दाखवावा. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राज्यात २०० हून अधिक जागा मिळण्याच्या बाता केल्या होत्या मात्र, त्यांना केवळ ७७ जागांवरच समाधान मानावे लागले होते, असा टोलाही ममता यांनी भाजपला लगावला.

आमच्या खासदाराचा अपमान केला
दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार महुआ मोईत्रा यांच्या समर्थनार्थ टीएमसी प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कृष्णानगरमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपसोबत विरोधी पक्षांच्या भारतातील मित्र पक्ष सीपीआय(एम) आणि काँग्रेसवर भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप केला. यासोबतच ममता म्हणाल्या की, आमच्या खासदार महुआ मोईत्रा यांचा भाजपकडून अपमान करण्यात आला. त्यांनी भाजप सरकारविरोधात आवाज उठवल्यामुळे त्यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली, असेही ममता म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR