मुंबई : अर्थमंत्री अजित पवारांकडून यंदा ११ व्यांदा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवारांनी जलयुक्तशिवार आणि राज्यातील सिंचन प्रकल्पाची माहिती दिली.
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सोमवारी मांडला. यावेळी अजित पवारांनी जलयुक्तशिवार आणि राज्यातील सिंचन प्रकल्पाची माहिती दिली. राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे ५ हजार कोटी रुपये किमतीची कामे नाबार्ड अर्थसहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली तर जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत ५ हजार ८१८ गावांमध्ये ४ हजार २२७ कोटी रुपये किंमतीची १ लाख ४८ हजार ८८८ कामे हाती घेण्यात आली आहेत.
अभियानातील सर्व कामे मार्च, २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत, असे आश्वासनही अजित पवार यांनी दिलं. पुढे ते असेही म्हणाले, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार ही योजना राज्यात कायमस्वरुपी राबविण्यात येणार आहे. सन २०२५-२६ मध्ये ६.४५ कोटी घनमीटर गाळ काढण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले असून त्यासाठी ३८२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत ८८ हजार ५७४ कोटी रुपये असून प्रकल्पाचे लाभक्षेत्र ३ लाख ७१ हजार २७७ हेक्टर आहे. या प्रकल्पाचा लाभ नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाणा या सहा जिल्हयांना होणार आहे. प्रकल्पाची सविस्तर सर्वेक्षण व अन्वेषणाची कामे सुरू आहेत.