पुणे : तेलंगणा रोईंग संघटनेच्या हैदराबाद बोट क्लब येथे भारतीय रोईंग संघटना (आरएफआय) च्या वतीने आयोजित २४ व्या सब ज्युनियर आणि ७व्या आंतरराज्य चॅलेंजर राष्ट्रीय रोईंग चॅम्पियनशिपमध्ये येथील एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या डॉ.विश्वनाथ कराड क्रीडा अकादमीच्या महिला संघाने रौप्य पदकाची कमाई केली आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) मान्यतेने झालेल्या या स्पर्धेत देशभरातील २० राज्यांच्या संघांनी सहभाग नोंदविला होता. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या महिला रोईंग संघाचे प्रतिनिधित्व करणा-या अनुष्का अर्जुन गर्जे, भाग्यश्री केशव घुले, स्नेहा योगेशसिंग सोळंकी आणि नेहा गजानन बधे यांच्या संघाने ५०० मीटर स्प्रिंट प्रकारात १ :५१.३९ अशा वेळेची नोंद करताना रौप्य पदकाची कमाई केली. तर याच प्रकारात हरियाणा संघाने १:५०.५६ अशी वेळ नोंदविताना सुवर्णपदक पटकावले तर केरळ संघाला(१:५२.०५) कांस्यपदक मिळाले.
राष्ट्रीय रोईंग प्रशिक्षक संदीप भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एमआयटी एडीटी’च्या महिला रोईंग संघाच्या रौप्य कामगिरीनंतर विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रा. डॉ.सुनीता कराड, प्र. कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक पद्माकर फड यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.