मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक मुद्यांवरून वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली, तर विजय वडेट्टीवार यांच्याकडे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यातच आता विधिमंडळातील विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
काही मिडिया रिपोर्टनुसार, विधान परिषदेत काँग्रेसचे सदस्य जास्त आहेत. त्यामुळे आता काँग्रेसकडून विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र विधान परिषदेत आहेत. परंतु, या तीनही पक्षांमध्ये काँग्रेसचे सदस्य विधान परिषदेत जास्त असल्याने काँग्रेस आता विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाने विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली.
पत्रकारांशी बोलताना अंबादास दानवे यांनी सांगितले की, सत्ताधारी पक्षाने ठरवले की, विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेतेपद द्यायचे, तर ते शिवसेनेलाच मिळेल. कारण, शिवसेनेचे संख्याबळ जास्त आहे. विधिमंडळ नेते आणि विधिमंडळ गटनेते यावर ठरवतील. तसेच आम्ही विधिमंडळ सचिवालयाला कळवले आहे. ज्या वेळेस विरोधी पक्षनेता करण्याबाबत निर्णय होईल, तेव्हा त्यांनी आमच्या पक्षाला निमंत्रित करून विचारणा करावी. त्यापूर्वी त्यांनी तसा निर्णय घेतला पाहिजे. आम्ही केवळ विरोधी पक्षनेतेपदावर दावा करून काही अर्थ नाही. आमचा दावा विरोधी पक्षनेतेपदावर आहेच असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.