32.5 C
Latur
Monday, March 31, 2025
Homeधाराशिवतुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात एसआयटी नेमा, मकोका लावा

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात एसआयटी नेमा, मकोका लावा

धाराशिव : प्रतिनिधी
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणाच्या विरोधात महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी तुळजापूर दौ-यावर आले असता, महाविकास आघाडीच्या वतीने या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी आणि मुख्य आरोपींवर मकोका लावण्याची मागणी करत निवेदन देण्यात आले.

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात तुळजापूर शहर आणि ग्रामीण भागात ड्रग्ज व्यवसायाच्या मुळांचा कसून शोध घेण्याची मागणी केली आहे. या ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे थेट मुंबई आणि पुणेपर्यंत पसरले असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणातील मुख्य आरोपींवर कडक कायद्याचा अवलंब करून मकोका लावण्यात यावा. तसेच, तातडीने विशेष तपास पथक नेमून सखोल चौकशी करण्यात यावी. ड्रग्ज तस्करी प्रकरणात राजकीय पक्षांशी संबंधित काही पदाधिका-यांचा सहभाग असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.

५ आरोपींवर गुन्हे, २१ फरार
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत ३५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील ४ आरोपी अटकेत असून १० जण तुरुंगात आहेत. मात्र, २१ आरोपी अद्याप फरार आहेत, ज्यामध्ये माजी नगराध्यक्षांचे पती विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष बापू कणे, माजी सभापती शरद जमदाडे यांचा समावेश आहे.

या प्रकरणातील गंभीर आरोपींवर कठोर कारवाई आणि मकोका लावण्याची मागणी करत महाविकास आघाडीने मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट सवाल केला आहे की, सरकार या प्रकरणात कडक कारवाई करण्यास कितपत सक्षम आहे?

तुळजापूरसारख्या पवित्र भूमीत ड्रग्ज तस्करीचे जाळे पसरले असताना, राज्य सरकारने कडक पावले उचलून दोषींना कठोर शिक्षा केली नाही, तर या पवित्र स्थळाचा अपमान होईल, असा इशारा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR