जयपूर : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी बुधवारी २४ तासांनंतर फरार झालेल्या हल्लेखोरांवर प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. गोगामेडी यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी डीजीपी उमेश मिश्रा यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. एडीजी क्राइम दिनेश एनएम यांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. डीजीपीं म्हणण्यानुसार, गोगामेडी हत्या प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींची ओळख पटली आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही.
डीजीपीं दिलेल्या माहितीनुसार, एफआयआर दाखल होताच, आरोपींची माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूरमध्ये मंगळवारी दुपारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. श्याम नगर भागातील त्यांच्या घरी भेटण्याच्या बहाण्याने आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्या राहत्या खोलीत त्यांच्यावर गोळीबार केला.
सुखदेव सिंग गोगामेडी यांना गंभीर अवस्थेत मानसरोवर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. राज्यात भाजपच्या विजयाने गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.
हिंसक निदर्शने होण्याची भीती
राज्यात हिंसक निदर्शने होण्याची भीती असल्यामुळे पोलिसांनीही अलर्ट जारी केला असून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवू नये म्हणून प्रत्येक भागात सुरक्षा वाढवावी, असे सांगितले आहे. राजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांची मंगळवारी जयपूरमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानंतर लोकांमध्ये संताप वाढत आहे. राजपूत समाजाने बुधवारी राज्यात बंदची घोषणा केली असून या बंदला अनेक जिल्ह्यात पाठिंबा देण्यात येत आहे.