21.2 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील परिस्थिती यूपी-बिहारपेक्षा वाईट

महाराष्ट्रातील परिस्थिती यूपी-बिहारपेक्षा वाईट

जयंत पाटलांची सरकारवर टीका

मुंबई : कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सत्ताधारी महाराष्ट्राचा बिहार करणार का? असा सवाल मी विचारला होता. हे तर महाराष्ट्राला यूपी-बिहारपेक्षा वाईट करायला निघालेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींवर टीका केली आहे. मागील काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील आमदारांचे एकामागून एक कारनामे समोर येत असून, यावरूनच जयंत पाटील यांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे.

जयंत पाटील यांनी ट्वीट करत म्हटले, काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तार यांनी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले होते. यावेळी त्यांनी शिवीगाळही केली होती. त्यानंतर भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी पुणे येथील कार्यक्रमात पोलिस कर्मचा-याच्या कानशिलात लगावली होती. हे प्रकरण शांत होत नाही तोच काल मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटलांचा एका बैठकीतच एकमेकांना शिवीगाळ करणारा ऑडिओ व्हायरल झाला. ‘हे तर महाराष्ट्राला यूपी बिहारपेक्षा वाईट करायला निघालेत!’ असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, पंजाबराव देशमुख आणि अनेक मोठ्या नेतृत्वाचा आदर्श या महाराष्ट्राला आहे. या नेत्यांनी कधी आपली पातळी खाली जाऊ दिली नाही. मात्र आज सत्तेत सामील असलेले मंत्री, आमदार, खासदार कधी सामान्य माणसांवर लाठीचार्ज करायला सांगतात, कधी पोलिस बांधवांच्या कानशिलात लगावतात तर कधी एकमेकांचा पानउतारा करतात. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पार धिंडवडे काढले जात आहेत हे महाराष्ट्र बघतोय! असे म्हणत त्यांनी निषेध केला आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

अब्दुल सत्तारांची दोन दिवसांत दोन प्रकरणे चर्चेत…
नेहमी कोणत्याना कोणत्या कारणांनी चर्चेत राहणारे अब्दुल सत्तार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण दोन दिवसांत त्यांची दोन प्रकरणे समोर आली असून, त्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सिल्लोड येथे बुधवारी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र, कार्यक्रम सुरू झाल्यानंतर समोर बसलेल्या काही तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केली आणि कार्यक्रम थांबवावा लागला. त्यामुळे संतापलेल्या अब्दुल सत्तार माईक घेऊन थेट स्टेजवर पोहोचले. त्यांनी पोलिसांना थेट लाठीचार्ज करून हुल्लडबाजी करणा-या तरुणांना जेलमध्ये टाकण्याच्या सूचना दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR