नागपूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात जाहीर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र ठरलेले राज्यातील तब्बल ६ लाख ५६ हजार शेतकरी योजनेच्या लाभापासून अद्याप वंचित असल्याची कबुली सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी गुरूवारी विधानसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे. या शेतक-यांना सन्मान योजनेचा लाभ देण्यासाठी ५ हजार ९७५ कोटी ५१ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी शेतकरी सन्मान योजनेबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात पाटील यांनी शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत पात्र शेतक-यांना लाभ देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २०२२ मध्ये दिले होते तरीही ६ लाख ५६ हजार शेतक-यांना त्याचा लाभ मिळाला नसल्याचे पाटील यांनी उत्तरात मान्य केले आहे.
राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतक-यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडून शेतक-यांची थकित कर्जाच्या विळख्यातून सोडून करण्यासाठी अल्पकालीन तसेच दीर्घकालीन उपाय योजना सुचविण्यासाठी सरकारने ३० ऑक्टोबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चाधिकार समिती गठीत केल्याचे बाबासाहेब पाटील यांनी उत्तरात नमूद केले आहे.

