मुंबई : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी सहाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने निवडणूक बिनविरोध होणार हे आधीच स्पष्ट झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आज त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करून त्यांना विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरले. सातव्या अपक्ष उमेदवाराच्या अर्जावर सूचक, अनुमोदकांच्या सह्या नसल्याने तो अर्ज छाननीतच बाद झाला होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. ती संपल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी डॉ. अजित गोपछडे(भाजप) माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे (काँग्रेस) माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा ( शिवसेना-शिंदे) व प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी- अजित पवार) यांची निवड झाल्याचे घोषित करून, त्यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.