28.5 C
Latur
Saturday, May 11, 2024
Homeसोलापूरवैष्णवांच्या उपस्थितीत माघवारी सोहळा उत्साहात

वैष्णवांच्या उपस्थितीत माघवारी सोहळा उत्साहात

पंढरपूर/प्रतिनिधी (अपराजित सर्वगोड)
पंढरीत माघवारी सोहळ्यानिमित्त मंगळवारी जया एकादशी दिवशी चार लाखाहून अधिक भाविक दाखल झाले होते. पंढरीत आलेल्या भाविकांनी चंद्रभागा नदीत पवित्र स्रान करून नगरप्रदक्षिणा करून विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच गर्दी केली होती. एकादशी दिवशी दर्शना रांग गोपाळपूर पर्यंत पोहोचली होती. श्री विठ्ठलाच्या चरण दर्शनासाठी सुमारे बारा ते पंधरा तास लागत आहेत.

विविध ठिकाणाहून आलेल्या संतांच्या ंिदडीमध्ये भाविक सामील होऊन विठू नामात तल्लीन झाले होते.
जया एकादशीनिमित्त पहाटे श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेची नित्य पूजा अनुक्रमे मंदिर समिती सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर व श्रीमती शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते संपन्न झाली. माघवारी निमित्त गेल्या काही दिवसांपासून पंढरपुरात भाविक दाखल होऊ लागले होते. एकादशी सोहळ्यादिवशी शहरात सुमारे चार लाखाहून अधिक भाविक दाखल झाले होते. यात्रा कालावधीत मंदिर समितीने दहा तात्पुरते दर्शन मंडप उभे केले आहेत.भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी दर्शन रांगेत कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांगेत भाविकांना चहा, पिण्याचे पाणी, अन्नदान याचबरोबर एकादशी दिवशी उपवासाचे पदार्थ देण्यात आले.

एकादशी निमित्त पुणे येथील दानशुर भाविकांनी सेवाभावी तत्वावर मोफत फुलांची आरास केली होती. त्यासाठी २०० टन फुलांचा वापर केला होता .त्यामध्ये प्रामुख्याने झेडू, शेवंती व इतर फुलांचा समावेश होता. येणा-या भाविकांच्या सुरक्षेसाठी पंढरपुरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनूचित प्रकार घडू नये, गर्दीवर नियंत्रण रहावे यासाठी सीसीटीव्ही कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. पंढरीत आलेल्या भाविकांना चंद्रभागा नदीत पाणी कमी असल्याने स्रान करता न आल्याने साठलेल्या दुषित पाण्यात भाविकांना पवित्र स्रान करावे लागले. यामुळे भाविकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पंढरीत आलेल्या भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी आरोग्य प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली होती. आपत्कालीन कक्षात फोन आल्याने डॉ. सुनील होनमाने, पायलट नितीन. जेरक यांनी तत्काळ ६५ एकर व दर्शन रांगेत जाऊन त्रास होत असलेल्या भाविकांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.यामुळे भाविकातून समाधान व्यक्त करण्यात आले. दर्शन रांगेतील भागाबाई काकडे या महिलेस त्रास होत असल्याचा दुरध्वनी आपत्कालीन कक्षात आला होता. याची दखल घेऊन तात्काळ उपाय योजना करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR