सोलापूर : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने आयोजित केलेल्या ‘प्लॉग रन’ (धावता धावता कचरा उचलणे) या कार्यक्रमात शहरातील ७० शाळांतील सहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्लास्टीकमुक्त, कचरामुक्त सोलापूर या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
महापालिका आयुक्त शीतल तेली गले, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, सहायक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. शहरातील एकूण १२ मार्गांवर विद्यार्थी, शिक्षकांनी रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा उचलून डस्टबिनमध्ये फेकला. यादरम्यान, रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना स्वच्छतेची सवय लागावी यासाठी संदेश दिला. या मोहिमेत पालिकेचे सर्व आरोग्य निरीक्षक, विभागीय अधिकारी सहभागी होते.
इंद्रभुवन इमारतीजवळ या मोहिमेचा समारोप झाला. यावेळी आमदार सुभाष देशमुख, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त तैमूर मुलाणी, मुख्य लेखापाल जवळगेकर आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्लास्टिकमुक्त सोलापूर ही नाटिका सादर केली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सरस्वती चौक, दत्त चौक ते सिद्धेश्वर प्रशाला, डीआरएम कार्यालय ते महात्मा गांधी पुतळा ते डफरिन चौक, व्हीआयपी चौक ते एम्प्लॉयमेंट चौक, सात रस्ता ते रंगभवन चौक, विजापूर वेस ते सिद्धेश्वर प्रशाला, गेंट्याल चौक ते पाथरूट चौक, भैया चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सोलापूर ग्रामीण हेडक्वार्टर ते सिव्हिल चौक ते रंगभवन चौक, पूनम गेट ते रंगभवन चौक, राजेंद्र चौक ते पोटफाडी चौक, गांधीनगर कॅम्प शाळा ते निमग पोटफाडी चौक या मार्गावर हा प्लॉग रन निघाला. या मार्गावर स्वच्छता करून विद्यार्थी एकत्र इंद्र भुवन इमारतीजवळ आले.