सोलापूर :
गतवर्षी जिल्ह्यात अल्पप्रमाणात पाऊस पडल्याने जिल्ह्यातील काही गावांत टँकरने पाणीपुरवठा होत आहे. सध्या चार तालुक्यांतील सहा गावे, ६४ वाड्यावस्त्यांवरील २५ हजार लोकांना शासकीय टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ‘पेयजल टंचाई’द्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये माळशिरस तालुक्यातील भांब, पिंपरी आणि २७ वाड्यावस्त्या, माढा तालुक्यातील तुळशी, करमाळा तालुक्यातील २० वाड्या आणि घोटी, साडेगाव, मंगळवेढा तालुक्यातील १७ वाड्या आणि यड्राव गावात शासकीय टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
चार तालुक्यांतील सहा गावे, वाड्यावस्त्यांवर सहा टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, येत्या काही दिवसांत आणखी टैंकर सुरू करावे लागणार आहेत.
गतवर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने ऐन पावसाळ्यात काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. मध्यंतरी पाणी टाकण्याची मुदत संपल्याने काही दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र, आता मागणी सातत्याने होत असल्याने पुन्हा टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. कमी पाऊसकाळ व उजनी धरण मायनसमध्ये गेल्याने जिल्ह्यातील मोठ्या संख्येच्या गावांतही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उजनी धरणापासून काही
अंतरावर असलेल्या कुडूवाडीसारख्या शहरात सात ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही सारखीच परिस्थिती आहे. वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांना मात्र पाण्यासाठी लांबवर भटकंती करण्याची वेळ आली आहे.
एके काळी सोलापूर जिल्हा हा टँकरच्या संख्येत राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेला जिल्हा होता. २०१२-१३ च्या काळात जिल्ह्यात जवळपास साडेपाचशेच्यावर टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. त्यावेळी जिल्ह्यात विदारक स्थिती होती. त्यानंतर २०१४ च्या नंतर राज्यात ‘जलयुक्त शिवार’ ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली. ही मोहीम जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने राबविली. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रफीक नाईकवाडी यांच्या पुढाकारामुळे ‘जलयुक्त शिवार’ योजनेचे चांगले काम जिल्ह्यात झाले होते.
त्यानंतर राज्याच्या सुदैवाने पाऊसही चांगला झाला होता.त्यामुळे जिल्ह्यातील टँकरची संख्या पन्नाशीच्या खाली आली होती. त्यानंतर यंदाच्या वर्षी खूपच कमी पाऊस झाल्याने टँकरची संख्या वाढू लागली प आहे. उजनी धरणातील साठा पिण्यासाठी राखीव ठेवला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पुन्हा जलसंधारणाच्या कामांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज भासणार आहे.