सिन्नर : राज्यात सध्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर बसस्थानकाला चांगलाच फटका बसला आहे. सिन्नर बसस्थानकाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे.
तुफानी पावसामुळे सिन्नर येथील हायटेक बसस्थानकाचा काही भाग कोसळल्याची गंभीर घटना समोर आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने संपूर्ण बसस्थानक रिकामे केले असून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे सिन्नर शहरातील अनेक रस्ते बंद करण्यात आले असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. बसस्थानकातील ही घटना पावसामुळेच घडल्याचे प्राथमिक अंदाज आहे, मात्र नेमका कोणता भाग आणि कोणत्या कारणामुळे कोसळला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर बसस्थानकात वीज पडल्याने स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. हा स्लॅब शिवशाही आणि एका खाजगी कारवर कोसळला आहे. ज्यामुळे खाली उभ्या असलेल्या शिवशाही बसचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने बसमधील प्रवाशांना आपत्कालीन मार्गाने बाहेर काढण्यात आले आहे. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या घटनेत शिवशाही बससह एका खाजगी वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
विशेष म्हणजे, हे बसस्थानक सिन्नरचे आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आले होते. परंतु या बसस्थानकाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले आहे. सध्या सिन्नर शहरात जोरदार पाऊस सुरू असून, सरस्वती आणि देव या दोन्ही नद्यांना पूर आला आहे त्यामुळे परिसरातील स्थिती अधिकच बिकट झाली आहे.