नवी दिल्ली : विद्यमान वंदे भारत एक्स्प्रेस लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर असताना भारतीय प्रवासी आता आणखी अधिक सुविधा, सुलभता, सुरक्षितता यांनी युक्त असलेल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनची आतुरतेने वाट पाहात असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय रेल्वे यावर भर देत आहे. चेन्नईस्थित आयसीएफ कंपनीत बीईएमएलच्या सहकार्याने पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन आकार घेत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे.
भारतीय रेल्वे येत्या काही महिन्यांत वंदे भारत एक्सप्रेसची पहिली स्लीपर आवृत्ती सादर करण्याच्या योजनेवर काम करत आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनची तयारी सुरू असून, त्यावर वेगाने काम सुरू आहे. मार्चपर्यंत आमचे लक्ष्य जवळपास पूर्ण होत आहे. लवकरच आपल्याला पहिली स्लीपर वंदे भारत ट्रॅकवर धावताना दिसणार आहे, असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला. नवीन स्लीपर वंदे भारत स्लीपर ट्रेन विद्यमान राजधानी एक्स्प्रेसपेक्षा चांगली असेल, असे सांगितले जात आहे.
स्लीपर वंदे भारतची वैशिष्ट्ये काय असतील?
राजधानी एक्स्प्रेस ट्रेनच्या तुलनेत यात अधिक आरामदायी बर्थ असतील. वरच्या बर्थवर चढण्याच्या सोयीसाठी उत्तम डिझाइन केलेला जिना प्रवाशांसाठी खास ठरू शकेल. नवीन स्लीपर वंदे भारत ट्रेन चांगल्या कपलर्ससह येणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना धक्का बसणार नाही. सेन्सरवर आधारित दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. आताच्या वंदे भारत एक्स्प्रेसप्रमाणे, स्लीपर वंदे भारत ट्रेनची वेग क्षमता ताशी १६० किमी असेल. वंदे भारत स्लीपर ट्रेन रात्रीच्या प्रवासासाठी विशेषत: फायदेशीर ठरेल. १६ ते २४ डब्यांच्या वंदे भारत स्लीपर प्रोटोटाइपमध्ये ११ एसी ३ टियर कोच, ४ एसी २ टियर कोच आणि एक एसी फर्स्ट कोच असेल. ट्रेनची एकूण बर्थ क्षमता ८२३ प्रवासी असेल.
८० स्लीपर वंदेची निर्मिती
बीईएमएलच्या सहकार्याने पहिल्या ८० स्लीपर वंदे भारत ट्रेनची निर्मिती केली जाणार आहेत. तर आरव्हीएनएल आणि एका रशियन कंपनीच्या संयुक्त विद्यमाने दुसरे एक प्रोटोटाइप व्हर्जन तयार केले जात असून, त्या प्रोटोटाइप पद्धतीच्या १२० स्लीपर वंदे भारत ट्रेन तयार केल्या जाणार आहेत. भारतीय रेल्वेने सुरुवातीला २०० स्लीपर वंदे भारत ट्रेन आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.