28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रस्मार्ट शहरांना मिळणार १३० कोटींचा निधी!

स्मार्ट शहरांना मिळणार १३० कोटींचा निधी!

छत्रपती संभाजीनगर – केंद्र शासनाने देशभरातील १०० शहरांसाठी ‘सिटीज २.०’ अभियानाची घोषणा केली आहे. त्यात १८ शहरांना १२० ते १३० कोटींचा निधी मिळणार आहे. त्यासाठी सर्वच स्मार्ट शहरांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन देखील प्रस्ताव दाखल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

देशभरातील १०० शहरांसाठी केंद्र शासनाचे ‘स्मार्ट सिटी’ अभियान राबवले जात आहे. या अभियानाअंतर्गत पाच वर्षांत सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च करून कामे केली जात आहेत. स्मार्ट सिटी अभियानाची मुदत संपली असली तरी नवी मुदत २०२४ पर्यंत देण्यात आली आहे.
सध्या सुरू असलेली कामे या मुदतीत संपविण्याची सूचना वारंवार केंद्र शासनातर्फे केली जात आहे. असे असले तरी स्मार्ट सिटीचे पुढे काय होणार, याविषयी देशभरात वारंवार चर्चा सुरू आहेत. असे असताना या शहरांसाठी केंद्र शासनाने ‘सिटीज २.०’ अभियान जाहीर केले आहे.

यासंदर्भातील घोषणा नुकतीच दिल्लीत करण्यात आली. अभियानात उत्कृष्ट प्रस्ताव देणा-या १८ शहरांना १२० कोटी ते १३० कोटींचा निधी मिळणार आहे. त्यासाठी शंभर शहरांना जानेवारी अखेरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. सादर झालेल्या प्रस्तावांची छाननी करून त्यातील सर्वोत्तम अठरा प्रस्तावांना म्हणजेच १८ शहरांना निधी दिला जाईल, असे केंद्र शासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

‘सिटीज २.०’ अभियानात घनकचरा व्यवस्थापनाला प्राधान्य राहणार आहे. त्यामुळे घन कचरा व्यवस्थापनात वैशिष्ट्यपूर्ण प्रस्ताव पाठविणा-या शहरांना हा निधी मिळण्याची शक्यता आहे. या अभियानात छत्रपती संभाजीनगर शहराच्या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने महापालिकेच्या समन्वयाने प्रस्ताव सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.
यापूर्वी केंद्र शासनाने ‘सिटीज १.०’ अभियान राबविले मात्र त्यात छत्रपती संभाजीनगर शहराने भाग घेतला नव्हता, असे सूत्रांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR