पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीई द्वारे राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठ परिसरातील संत श्री ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती डोममध्ये १९ ते २३ डिसेंबर २०२३ दरम्यान देशभरातील २७ संघांमध्ये ही राष्ट्रीय स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ १९ डिसेंबर रोजी होणार असून तो ‘एज्युमेटीका’चे संस्थापक संजीव कुमार व ‘इन्फोसिस पुणे’चे वरिष्ठ उपाध्यक्ष, मृत्युंजय सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. सोबतच, डॉ. सुनीता कराड, प्र. कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. मोहित दुबे, डॉ. रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन जीवनात भेडसावणा-या समस्यांचे निराकरण करण्यासाठी व त्यांच्या नवकल्पना सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देते. एमआयटी एडीटी विद्यापीठ हे या स्पर्धेसाठीचे नोडल केंद्र असून या स्पर्धेत आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पाँडेचेरी, कर्नाटक, केरळ, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांतील २७ संघांचे विद्यार्थी हजेरी लावणार आहेत. हे संघ कृषी, फूडटेक आणि ग्रामीण विकास, मेडटेक/बायोटेक/हेल्थटेक, हेरिटेज आणि कल्चर, फिटनेस आणि स्पोर्टस् आणि स्मार्ट ऑटोमेशन या डोमेनमधून निवडलेल्या आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण करतील. यावर्षी देखील १९ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.