नवी दिल्ली : डिसेंबरचा अर्धा महिना उलटून गेल्याने आता वातावरण थंड झाले आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानसह इतर राज्यांमध्ये थंडी वाढली आहे.
आयएमडीनुसार, शुक्रवार दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी दिल्लीत ५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. दिल्लीच्या सफदरजंगमध्ये तापमान ४.९ अंश सेल्सियस होते. हरियाणातील हिसार हे भारतातील मैदानी प्रदेशातील सर्वात थंड ठिकाण होते. येथील किमान तापमान ४.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. आयएमडीनुसार, लोधी रोड, आयानगर, दत्तवा पथसह दिल्लीतील अनेक भागात दाट धुके दिसले. शुक्रवारी सकाळी पंजाबच्या अमृतसरमध्येही दाट धुक्याची चादर होती. येथील किमान तापमान ६ अंश सेल्सिअस होते.
थंडीच्या लाटेमुळे अमृतसरमधील लोक शेकोटी पेटवताना दिसले. आयएमडीने सांगितले की, हरियाणा, चंदिगड, यूपी, मध्य प्रदेश, बिहार, आसाम, मेघालय, उत्तर राजस्थान आणि त्रिपुरामध्येही मध्यम धुके दिसून आले. भारतातील बहुतांश भागात दृश्यमानता ५०० मीटरपेक्षा कमी झाली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मते, १४ डिसेंबर रोजी दिल्लीतील अदक अत्यंत खराब होता. त्यात शुक्रवारी (आज) सुधारणा झाली आहे. ते ‘खूप खराब’ वरून खराब यादीत गेले आहे.
पुढील चार दिवस धुक्याचे
पुढील चार दिवस दिल्लीसह इतर राज्यांत हलके धुके पडण्याची शक्यता आहे, असे आयएमडीने म्हटले आहे. तसेच या आठवडाभरात या सर्व भागांच्या तापमानात विशेष बदल अपेक्षित नसल्याचेही त्यात म्हटले आहे. मात्र, पुढील आठवडाभरात देशाच्या काही भागांत किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
इतर राज्यांतील हवामानाची स्थिती
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य-पश्चिम अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता होती. १६ डिसेंबरपासून उत्तर-पश्चिम हिमालयीन क्षेत्रावर पश्चिमी विक्षोभाचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख भाग प्रभावित होणार आहेत.
तीन राज्यांत पावसाची शक्यता
आयएमडीनुसार, १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान तामिळनाडूमध्ये वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. १७ डिसेंबर रोजी केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील दोन आठवडे दोन्ही राज्यांत हलका ते मध्यम पाऊस सुरू राहील.