हिंगोली : सध्या पुणे शहरातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे चर्चेत आहे. या रुग्णालयाचा हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचे प्रकरण सध्या तापले आहे. त्यातच आता अकोल्यातही असाच काहीचा प्रकार समोर आला आहे. अकोल्यातील एका खासगी रुग्णालयाने डिपॉझिट न भरल्याने रुग्णाला व्हेंटिलेटर नाकारल्याचा आरोप होत आहे. आता याप्रकरणी शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी खासगी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला चांगलेच झापल्याचे समोर आले आहे. त्यांची एक कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील एका कार्यकर्त्यांने आमदार संतोष बांगर यांना फोन करून एका खासगी रुग्णालयाबद्दल तक्रार केली. हे रुग्णालय त्या कार्यकर्त्याच्या नातेवाईकांना दाखल करून घेण्यास नकार देत असल्याची तक्रार त्यांनी केली. यानंतर आमदार संतोष बांगर यांनी तातडीने रुग्णालयाच्या व्यवस्थापकाला फोन केला. त्यांची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार संतोष बांगर रुग्णालयाच्या व्यवस्थापकाला खडसावत असल्याचे ऐकू येते.
तुमचे हॉस्पिटल कोणतं? तुम्ही या पद्धतीने करता का? लोकांकडे पैसे नसतील तर तुम्ही व्हेंटिलेटरवर पेशंटला घेत नाही? पैसे दिल्याशिवाय पेशंटला व्हेंटिलेटरवर घेत नाही, असे म्हणता? पेशंटला जर कमी जास्त झाले तर तुमच्या दवाखान्याची राख करेन, लक्षात ठेवा. अशा शब्दात संतोष बांगर यांनी रुग्णालयाला दम दिला.