21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्र... तर गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करून दाखवा

… तर गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करून दाखवा

मनसेचे भाजपाला प्रत्युत्तर

मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्क येथे ११ व्या वर्षी मनसेनं गुरूवारी दीपोत्सव साजरा केला. ‘दीपोस्तव २०२३’ चे उद्घाटन प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आणि सलीम खान यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावरून भाजपा नेते, आमदार आशिष शेलार यांनी मराठी कलाकारांचा उल्लेख करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आता शेलारांच्या विधानाला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ‘ भाजपाने गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करून दाखवावे’ असे प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान,‘दीपोत्सवाचे आयोजन कुठल्याही पक्षाने करावे. ते स्वागतार्ह आहे. कलाकाराला जात, धर्म, भाषा नसते. पण, गुरूवारी सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या उपस्थितीत एक उद्घाटन झाले. आम्ही गायिका उत्तरा केळकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन करतोय. आता मराठीचा प्रश्न कुणी कुणाला विचारायचा?’’ असा सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केला आहे.

‘दीपोत्सव करणा-यांनी सलीम खान आणि जावेद अख्तर यांना घेऊन टिमकी वाजवून घेतली. पण, आमचे मराठी कलाकार छोटे नाहीत. मराठी कलाकारांच्या उपस्थितीत दीपोत्सव झाला पाहिजे, ही भाजपाची संकल्पना आहे. आम्हीही एखाद्या कार्यक्रमाला सलीम खान आणि जावेद अख्तर यांना बोलवू. पण, तो कार्यक्रम दीपावलीचा नसेल,’’ असा टोला शेलारांनी राज ठाकरेंना लगावला होता.

यावरून संदीप देशपांडेंनी शेलारांना सुनावलक आहे. ‘भाजपाचे मराठी प्रेम हे पुतणा-मावशीचे आहे. एवढेच मराठीबद्दल प्रेम असेल, तर गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करून दाखवा. निदान बोलण्याची हिंमत तरी दाखवतील का? मराठी कलाकारांवर अन्याय झाल्यावर पाठिशी कोण उभे राहते, हे महाराष्ट्राला माहिती आहे. दिवाळीनिमित्त संकुचित बुद्धी असलेल्या लोकांच्या डोक्यात थोडा प्रकाश पडावा,’ असा टोलाही देशपांडेंनी शेलारांना लगावला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR