पुणे : मी जर प्रेस घेतली तर बीडच्या खासदाराची चड्डी राहणार नाही असे म्हणत खासदार बजरंग सोनवणे यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट टाकणा-या पोलिस अधिका-याची बदली करण्यात आली असून गणेश मुंडे असे बदली करण्यात आलेल्या पोलिस अधिका-याचे नाव आहे. खासदार बजरंग सोनवणेंनी आवाज उठवल्यानंतर अखेर वादग्रस्त पोलिस अधिकारी गणेश मुंडे यांची बदली करण्यात आली आहे. वादग्रस्त पोस्ट केल्या प्रकरणी तडकाफडकी बदली झाल्याचे बोलले जात आहे.
गणेश मुंडे यांची पुणे नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आली आहे. खासदार बजरंग सोनावणे यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून या पोलिस अधिका-यावर रोष व्यक्त करण्यात येत होता. व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. दरम्यान, आता राज्य सरकारने त्यांना बीड जिल्ह्यातून हटवले असून त्यांची पुण्यात बदली करण्यात आली आहे.
जर मी पत्रकार परिषद घेतली तर या बीडच्या खासदाराची चड्डीसुद्धा जागेवर राहणारी नाही, या आशयाची पोस्ट पोलिस अधिकारी गणेश मुंडे यांनी केली होती. गणेश मुंडे हे बीडमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. बीड पोलिसांचा एक अधिकृत व्हाट्सअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवर ही पोस्ट शेअर करण्यात आली होती. दरम्यान, बजरंग सोनवणे यांनीही याबाबत भाष्य केल्यानंतर ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर बजरंग सोनवणे यांनी या पोलिस अधिका-याचे देखील कॉल रेकॉर्ड चेक करावेत, अशी मागणी केली होती.
गणेश मुंडेंना ग्रुपमधून काढले
सहाय्यक पोलिस निरीक्षक असलेल्या गणेश मुंडेंनी अशा आशयाची पोस्ट केल्यानंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिस अधिका-यांच्या ग्रुपवरुन त्यांना काढून टाकण्यात आले होते. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी बीडमधील पोलिस अधिका-याच्या चौकशीची मागणी केली होती. दरम्यान, गणेश मुंडेंनी त्यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट केल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बीडचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी चार दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील पोलिसांवर आरोप केले होते. सोनवणे यांनी बीड जिल्ह्यातील काही अधिका-याची मानवाधिकार आयोगाकडे केली होती. याशिवाय गणेश मुंडे आणि दहिफळे यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी देखील केली होती.