सोलापूर : रेल्वे मंत्रालयाच्यावतीने साजरा करण्यात आलेल्या ६९ व्या रेल्वे सप्ताहामध्ये अति विशिष्ठ रेल्वे सेवा पुरस्कारांमध्ये मध्य रेल्वेला ६ बक्षिसे मिळाली. तर मध्य रेल्वेच्या विशेष रेल सेवा पुरस्कारामध्ये स्वच्छतेसाठीचा सर्वोत्कृष्ठ पुरस्कार हा सोलापूर रेल्वे स्थानकास मिळाला तसेच वक्तशीरपणासाठीचे वैयक्तिक बक्षिसदेखील सोलापूर विभागाला मिळाले. मध्य रेल्वेला मानाची गोविंद वल्लभ पंत शिल्ड प्रदान करण्यात आली.
६९ व्या रेल्वे सप्ताहामध्ये नवी दिल्ली येथील प्रगती मैदान येथे भारत मंडपम येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते मध्य रेल्वे विभागाला देशपातळीवरील सहा पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीना यांनी ही पारितोषिके स्विकारल्यानंतर त्यांचे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर महाव्यवस्थापक धरम वीर मीना यांनी विशेष रेल सेवा पुरस्कार सोहळ्यात विभाग/कार्यशाळा/स्थानकांना २३ आंतर-विभागीय कार्यक्षमता शिल्ड व्यतिरिक्त भुसावळ विभागाला एकूण कार्यक्षमता (ओव्हर ऑल ईफीशीएंसी) शिल्ड प्रदान केली.
तसेच ९७ रेल्वे अधिकारी आणि कर्मचा-यांना उत्कृष्ट काम गिरीसाठी विशिष्ट रेल सेवा पुरस्कारने सन्मानित केले. यावेळी अतिरिक्त महाव्यवस्थापक जगमोहन गर्ग, प्रधान कार्मिक अधिकारी सहर्ष बाजपेयी, सर्व विभाग प्रमुख, विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि मध्य रेल्वेचे इतर अधिकारी, मध्य रेल्वे महिला कल्याण संस्थेच्या अध्यक्षा आणि कार्यकारी समिती सदस्य आणि मान्यताप्राप्त युनियन प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
वैयक्तिक पुरस्कार श्रेणीमध्ये मुंबई विभाग २४ कर्मचा-यांना पुरस्कार मिळवून पुढे आहे, तर भुसावळ विभागाने १९ आणि मुख्यालयाने १८ वैयक्तिक पुरस्कार मिळवले. पुणे विभागातील १३, नागपूर विभागातील १२ आणि सोलापूर विभागातील ८ कर्मचा-यांनाही विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिग्नल अँड टेलिकॉम वर्कशॉप, माटुंगा वर्कशॉप आणि परेल वर्कशॉपमधील प्रत्येकी १ कर्मचा-यासह कार्यशाळांनाही गौरवण्यात आले.