23.1 C
Latur
Thursday, September 18, 2025
Homeलातूरसोलापूरच्या तरुणाचा लातुरात खून; मैत्रीण गंभीर

सोलापूरच्या तरुणाचा लातुरात खून; मैत्रीण गंभीर

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील पीव्हीआर चौक ते छत्रपती चौकाकडे जाणा-या रिंग रोडवरील लहुजी साळवे चौकात दि. १८ सप्टेंबरच्या मध्यरात्री पावणे एक वाजता कारच्यासमोर जीप आडवी लावून कारमधील सोलापूरच्या तरुणाचा भोसकून खून करण्यात आला तर त्याच कारमधील तरुणाच्या मैत्रिणीवर अनेक वार करून गंभीर जखमी केले आहे.

सोनाली भोसले रा. अंत्रोली ता. जि. सोलापूर व अनमोल अनिल केवटे रा. मंदु्रप ता. दक्षिण सोलापूर हे दोघे कारने लहुजी साळवे चौकातून सोलापूरला जात असताना एम. एच. २६ व्ही-२३५६ या क्रमांकाच्या जीपमधून आलेल्या दोघांनी कारसमोर जीप आडवी लावून कार थांबवली व जीपमधून उतरुन कारमधील अनमोल केवटे यांच्या मानेवर, हातावर चाकुने सपासप वार केले.

त्यात तो जागेवरच मरण पावला तर सोनाली भोसले यांच्या पाठीवर, पोटावर चाकुने वार करुन गंभीर जखमी केले. सोनाली हिच्यावर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. सोनाली भोसले व अनमोल केवटे हे दोघे लातूर तालुक्यातील खंडापूर येथे एका संघटनेच्या अधिवेशनाला आले होते, असे सांगण्यात येते. जेवण करुन हे दोघे सोलापूरला जाण्यासाठी निघाले असता रिंग रोडवर अनमोलचा खून झाला तर सोनाली गंभीर जखमी आहे.

अनमोलचा खून का झाला?, ते दोघे मारेकरी कोण?, ते दोघे खंडापूरला कोणत्या संघटनेच्या अधिवेशनाला आले होते?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान कारचालक नवनाथ धाकपाडे रा. सोलापूर याच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खून व खूनाचा प्रयत्न अशा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR