नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय सीमा सुरक्षा दलाचे जवान पी.के. साहू यांना पाकिस्तानने सोडले आहे. काही दिवसांपूर्वी पूर्णम कुमार शॉ यांनी चुकून सीमारेषा ओलांडली होती आणि ते पाकिस्तानमध्ये गेले होते. त्याठिकाणी पाकिस्तानी सैन्याने पी. के. शॉ यांना ताब्यात घेतले होते. मध्यंतरीच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑपरेशन सिंदूर नंतर युद्ध सुरु झाले होते.
त्यामुळे पी.के. शॉ पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. पाकिस्तानने त्यांना २३ एप्रिल रोजी पकडले होते. मात्र, आता भारतासोबत शस्त्रसंधी झाल्यानंतर पाकिस्तानने त्यांना सोडले आहे. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता अमृतसर येथील अटारी बॉर्डरवरुन पी.के. शॉ माघारी परतले. भारत-पाक सीमारेषेवर शेतक-यांच्या देखभालीसाठी भारतीय सैन्याने बीएसएफचे दोन जवान तैनात केले होते. फिरोजपूरमध्ये २३ एप्रिलला जवान पी.के. शॉ यांनी चुकून सीमारेषा ओलांडली होती. ही गोष्ट पाकिस्तानी सैन्याच्या लक्षात आल्यानंतर पाक रेंजर्सने त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील सगळी शस्त्रात्रं जप्त करुन पाकिस्तानने गेल्या २० दिवसांपासून त्यांना ताब्यात ठेवले होते.
नियंत्रण रेषेवर शेतक-यांना विशेष परवानगी देऊन शेती करायला दिला जाते. पी.के. शॉ यांना शेतक-यांच्या सुरक्षेसाठी फिरोजपूर येथे तैनात करण्यात आले होते. पीकांची पेरणी करताना आणि काढणी करताना बीएसएफ जवान त्यांच्या सुरक्षेसाठी व निगराणीसाठी तैनात असतात. या शेतक-यांना विशेष किसान कार्डही दिले जाते. या झिरो लाईनवर फक्त खांब बसविण्यात आले असून कुंपण रेषा त्याअगोदरच आहे. २३ एप्रिलला सकाळी सकाळी शेतकरी कंबाइन घेऊन फेंसिंगवरील गेट नंबर-२०८/१ च्या रस्त्याने शेतातील गहू काढणीसाठी शेतकरी गेले होते. पाकिस्तानने आपल्या हद्दीत कुंपणरेषा लावलेली नाही. त्यामुळे झिरो लाईन पार करुन पी.के. शॉ ऊन्हापासून दिलासा मिळविण्यासाठी एका झाडाखाली बसायला गेले होते. मात्र, ती जागा पाकिस्तानच्या हद्दीत होती. तेवढ्यात पाकिस्तानी रेंजर्स जल्लोके बीएसएफ चेक पोस्टवर पोहोचले. त्यानंतर, त्यांनी भारतीय सैन्य दलाच्या बीएसएफचे जवान पी.के. शॉ यांना ताब्यात घेतले होते. ही गोष्ट समजल्यानंतर भारताने पी.के. शॉ यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले होते. बीएसएफच्या अधिका-यांनी तातडीने बॉर्डरवर धाव घेतली होती. मात्र, त्यावेळी पी.के. शॉ यांची सुटका होऊ शकली नव्हती.