सिल्लोड : बांगलादेशी लोकांना जन्म प्रमाणपत्र दिल्याचा प्रकरणात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तिस-यांदा गुरुवारी दुपारी १ वाजता सिल्लोड येथील पोलीस ठाण्यात भेट दिली. आतापर्यंत बांगलादेशी लोकांविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी करणा-या सोमय्या यांनी आता चक्क सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण आणि त्यांचे कर्मचारी नगरपरिषद कर्मचा-यां विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांचे आरोप उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी फेटाळून लावले आहे.
सिल्लोड तालुक्यात ज्या बांगलादेशी लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले ते ठरवून झालेले षडयंत्र आहे. त्यात अधिकारी कर्मचा-यानी संगनमत केले. ४०६ लोकांना केवळ आधारकार्डच्या आधारे जन्म प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. यापूर्वी सिल्लोड शहरातील केवळ ३ लोकांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात वरील ४०६ लोकांसहित अधिका-यांना व कर्मचा-यांना सहआरोपी करा, अशी तक्रार किरीट सोमय्या यांनी सिल्लोड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिनेश कोल्हे, पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांना गुरुवारी दुपारी दिली. यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे सुरेश बनकर, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर मोठे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर, शहर अध्यक्ष कमलेश कटारिया, मनोज मोरेल्लू सहित अनेक भाजपचे पदाधिकारी हजर होते.
दोषी आढळल्यास कठोर कारवाई करू
या पूर्वी खोटे कागदपत्रे सादर करून जन्म प्रमाणपत्र मिळवणा-या तीन लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्या गुन्ह्यात सोमय्या याच्या तक्रारीचा समावेश करण्यात आला आहे. आता वरील लोकांचे कागदपत्रे तपासून संबंधीत अधिका-यांचा अहवाल आल्यावर चौकशीत दोषी आढळले तर त्यांच्या विरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वास सिल्लोड शहर पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांनी दिले.
एकालाही जन्म प्रमाणपत्र दिले नाही
ज्या ४०६ लोकांविरुद्ध सोमय्या यांनी तक्रार केली होती त्याची तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व नेमलेल्या पथक मार्फत चौकशी करण्यात आली आहे. त्याा नागरिकांचे स्थानिक रहिवाशी असल्याचे पुरावे आढळले आहे. आम्ही एकही बांगलादेशी नागरिकाला जन्म प्रमाणपत्र दिले नाही तसा अहवाल आम्ही जिल्हाधिकारी यांना दोन दिवसांपूर्वी दिला आहे. कुणी बांगलादेशी आढळलाच नाही तर आम्ही खोटे गुन्हे कसे दाखल करणार ४०६ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात येत आहे तसे केले नाही म्हणून माझ्यावर खोटे आरोप होत असल्याचे उपविभागीय दंडाधिकारी लतीफ पठाण यांनी सांगितले.