30 C
Latur
Monday, March 24, 2025
Homeपरभणीसोमनाथ सुर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच

सोमनाथ सुर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच

न्यायदंडाधिका-यांच्या अहवाल समोर पोलिसांचा कारनामा जगासमोर अहवाल मानवाधिकार आयोगासमोर सादर

परभणी : परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे न्यायदंडधिका-यांच्या अहवालात म्हटले आहे. सोमनाथच्या मृत्यूला पोलिस जबाबदार असल्याचेही अहवालातून पुढे आले आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील नवामोंढा पोलिस ठाण्यातील मारहाण प्रकरण नव्याने चर्चेत आले आहे.

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा पोलिस प्रशासनाने केला. अखेर न्यायदंडाधिका-यांच्या अहवाल समोर आला आहे, ज्यात पोलिसांच्या मारहाणीतच सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सुर्यवंशी हत्या प्रकरणी न्यायदंडाधिका-यांचा ४५१ पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला. आयोगाने संबंधित सर्व पोलिसांना नोटीसा बजावून उत्तर मागितले आहे.

मानवाधिकार आयोगाने याप्रकरणी राज्याचे मुख्य सचिव, गृह सचिव, अतिरिक्त पोलिस महासंचालक(गुन्हे), परभणी सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक यांनाही नोटीस बजावली आहे. तर परभणी जिल्ह्यातील नवामोंढ पोलिस ठाण्यात मारहाण करण्यात आली, असा निष्कर्ष न्यायदंडाधिका-यांनी त्यांच्या चौकशीतून काढला आहे. आता न्याय दंडाधिका-यांचा चौकशीचा अहवालातून धक्कादायक माहिती समोर आल्याने यात पोलिसांवर आता नेमकी काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नेमके प्रकरण काय?
परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढील संविधानाची विटंबना करण्यात आली होती. या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले होते. आंदोलकांनी वाहनांची प्रचंड तोडफोड केली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यात ३५ वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. सोमनाथ सूर्यवंशी यांचा रविवारी पोलिस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला. यामुळे आंबेडकरी समाजात संतापाची तीव्र लाट उसळली होती.

मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली खोटी माहिती
सोमनाथचा मृत्यू श्वसनाच्या विकाराने झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तसेच त्याच्या शरीरावरील जखमाही जुन्याच असल्याचे म्हटले होते. शवविच्छेदन अहवालातून मात्र मृत्यूचे खरे कारण स्पष्ट झाले होते. यानंतर पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर परभणीत एका पोलिस अधिका-यासह २ पोलिस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले. आता पोलिसांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR