सोलापूर : सोलापूरसह मराठवाड्यात डिसेंबरमध्ये अवकाळीचा पाऊस जोरात झाल्याने आणि यंदा सर्वच नक्षत्रात दमदार पाऊस पडल्याने ज्वारी पीक जोमदार आले आहे. दरम्यान, रब्बी हंगामातील ज्वारी पिकाच्या पेरणीला जमीन वापसाअभावी उशीर झाल्याने यंदा ज्वारी पेरणी कमीच झाली असली, तरीही जोमदार पीक आल्याने शेतक-यांचा आनंद सध्यातरी द्विगुणीत होत आहे.
रब्बी पिकाचा जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख आहे. त्यात रब्बीची सोलापूरची ज्वारी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. भूम तालुक्यातील माणकेश्वर परिसरातील ज्वारीही देशासह विदेशाच्या बाजारात चांगलीच भाव खाते. रब्बी काळात ज्वारीबरोबरच गहू, हरभरा, करडई, जवस, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी होते. उजनीचे सिंचन व सोलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यावर जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्र कमी होत गेले आहे. तरीही पेरणी केलेले ज्वारी पीक सध्यातरी जोमदार दिसून येत आहे. सध्याही आभाळी वातावरण असल्याने ज्वारी पीक भराभर वाढत जावून दाणेही टपोरी भरू लागल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले. इतकेच नाही तर यामुळे यंदा ज्वारीचा उतारही चांगला पडण्याचे संकेत त्यांनी दिले.
यंदा मुबलक पाणीसाठा असल्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. गेल्या २-३ वर्षांपासून वातावरणातील बदलामुळे सोलापूर जिल्ह्यातील पीक लागवडीचे तंत्रच बदलल्याचे दिसून येत आहे. यंदा खरिपात जून पासूनच पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे पेरणी वाढली आहे. डाळीचे भाव वाढल्याने तूर आणि हरभरा लागवडीकडे शेतक-यांचा ओढा दिसून येत आहे. खरिपात सोयाबीन करण्याकडेही लोकांचा कल वाढला आहे. तुरीला चांगला भाव येत असल्याने यावर्षी तुरीचे क्षेत्र वाढल्याचे दिसून आले. अति पावसामुळे गव्हाची पेरणी अजून सुरूच आहे. त्याचबरोबर हरभ-याची पेरणीही मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. त्यामुळे ज्वारीची पेरणी कमी झाली आहे.
करमाळा, माढा, मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र मोठे आहे. पण तुरीचे क्षेत्र वाढल्यामुळे ज्वारीची पेरणी कमी दिसत आहेजानेवारीपासून सोलापूर जिल्ह्यात हुरडा पार्ध्या सुरू होतात. पण ज्वारीचे क्षेत्र घटल्यामुळे हुरडा शोधण्याची वेळ आली आहे. खास ज्वारीसाठी पेरणी केलेले कणसे गतवर्षी शंभर रुपये किलोने विकली जात होती ती यंदा दोनशे रुपये किलोवर गेली आहेत. याशिवाय मागणीप्रमाणे हुरड्याच्या कणसाचा पुरवठा दिसून येत नाही. सध्यातरी सर्वत्र ज्वारी पिके भडकली असून, आता याचे पीक शेतक-यांच्या पदरात किती पडणार आणि त्या ज्वारीला किती भाव येणार? हे येणारा काळच सांगणार आहे.