कोल्हापूर : जिल्ह्यात सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली गेले असून, सरासरी प्रतिक्विंटल ४,४५० रुपयांनी विक्री करावी लागत आहे. हमीभावापेक्षा दीडशे रुपये कमी दराने विक्री होत आहे.
दर नाही म्हणून सोयाबीन घरात किती दिवस ठेवायचे? असा प्रश्न शेतक-यांना पडला असून, आता विक्रीशिवाय पर्याय नाही. शासनाच्या किमान हमीभावापेक्षाही दर खाली आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
जानेवारी महिन्यात घाऊक बाजारात सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल ४,७४२ रुपये होता. मार्चमध्ये तोच दर ४,४५० रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यातच सोयाबीनची विक्री केली असती तर बरे झाले असते, असे म्हणण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.
एका बाजूला तेलबियांचे क्षेत्र वाढावे यासाठी शासन प्रयत्न करत असताना सोयाबीनला हमीभावही मिळत नसेल तर हे पीक का घ्यावे, असा सवाल शेतकरी करत आहेत.
गोडेतेलाच्या दरातील घसरण कारणीभूत
गेल्या वर्ष-दीड वर्षापासून गोडेतेलाच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोयाबीन, कापसाचे दर कमी झाले आहेत.
सध्या सरकी, सोयाबीन, सूर्यफूल तेलाचे दर ९० ते १०० रुपये किलो आहेत. ते वाढल्याशिवाय सोयाबीनच्या दरात वाढ होणार नाही, असे व्यापा-यांचे म्हणणे आहे.