सोलापूर : सोलापूरसह राज्यात यंदाच्या हंगामात सोयाबीनचे चांगले उत्पादन होऊनही हमीभावाने कमी खरेदी झाल्यामुळे शेतक-यांची ओरड वाढली होती. त्यामुळे सोयाबीन खरेदीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात १ हजार ८६९ शेतक-यांचे ३० हजार ८९० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.
यंदा जिल्ह्यात १ लाख ३८ हजार ५३३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ४७ हजार ६६ हेक्टर आहे. सरासरीच्या तुलनेत २९४.३३ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मात्र, सोलापूरसह राज्यात सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात असताना नाफेड “कडून हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले. विलंबाने सुरू झालेली खरेदी, १२ टक्के ओलाव्याची अट, सततच्या पावसामुळे सोयाबीनमध्ये असलेला ओलावा, बारदान्याच्या अनुपलब्धतेमुळे खोळंबलेली खरेदी यामुळे खरेदी केंद्रांवर सोयाबीनची खरेदी कमी झाली.
दरम्यान, केंद्र सरकारने १५ टक्के ओलावा गृहीत धरून सोयाबीन खरेदी करण्याचे आदेश दिले. मात्र, खरेदीसाठी १२ जानेवारीपर्यंतची मुदत होती. उन्हामुळे ओलावा घटल्याने बाजारात सोयाबीनची आवक वाढत असताना केंद्र बंद होणार असल्याने शेतक-यांतून ओरड सुरू झाली. परिणामी केंद्राने सोयाबीन खरेदीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत वाढवून दिली आहे.
केंद्र सरकारने सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. सोलापूर बाजार समितीत गुरुवारी (ता. १६) १०४ क्विंटल सोयाबीनची आवक होती. प्रतिक्विंटल ३ हजार ९०० ते ४ हजार १७० रुपये दर मिळाला. सरासरी ४ हजार रुपयाने सोयाबीनची विक्री झाली. त्यामुळे शेतक-यांना साधारण: १ हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. खरेदी केंद्रांवरील अटी व बाजारातील पडलेले दर यामुळे अनेक शेतक-यांचा सध्या सोयाबीन विकण्याकडे कल नसल्याचे दिसत आहे. राज्यात अन्यत्र बारदान्याची अडचण निर्माण झाली असली तरी सोलापुरात पुरेशा प्रमाणात बारदाना उपलब्ध होता. त्यामुळे खरेदीला कोणतीही अडचण आली नाही. ३० हजार ८९० क्विंटल सोयाबीनची खरेदी केली आहे. आता ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे शेतक-यांनी हमीभाव खरेदीसाठी नोंदणी करावी असे पणन अधिकारी हरिदास भोसले यांनी सांगीतले.